राहुरी : प्रतिनिधी
तालुक्यात महावितरण विभागाची 20 हजार 740 ग्राहकांकडे 2 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी झाल्याने ग्राहकांना थकबाकी भरा, अन्यथा वीजकनेक्शन बंद करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. मार्चअखेर असल्याने अधिकारी व कर्मचार्यांनी वसुली मोहीम हाती घेतल्यानंतर 84 लाख रुपयांची वसुली केली.
दोन महिन्यांपूर्वी महावितरणने शेतकर्यांची थकबाकी वाढल्याने रोहित्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शेतकर्यांसाठी विशेष योजनेच्या माध्यमातून तीन महिन्यांचे एक बील भरण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे शेतकर्यांकडील असणारी बहुतांश थकबाकी वसूल करण्यात महावितरणला यश आले होते. त्यानंतर मार्चअखेरीस राहुरी उपविभागातील घरगुती व व्यावसायिक असलेले 20 हजार 740 ग्राहकांकडे तब्बल 2 कोटी 29 लाख रुपये थकित वसुलीची जबाबदारी अधिकारी व कर्मचार्यांवर सोपविण्यात आली.
उपअभियंता धीरज गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कनिष्ठ अभियंता व वीज कर्मचार्यांनी थकबाकीदारांकडे तगादा लावत वीजतोड मोहीम हाती घेतली आहे. परिणामी, थकित ग्राहकांकडून वसुलीला प्रतिसाद लाभत असून 2 कोटी 29 लाखांपैकी 84 लाख रुपयांची वसुली करण्यात महावितरणला यश आले आहे. दरम्यान, 1 कोटी 45 लाख वसुलीचा आकडा गाठण्यासाठी मार्च महिन्याचे केवळ 15 दिवस शिल्लक आहेत. यामुळे महावितरणवर वसुली केल्याशिवाय पर्याय नसून थकबाकीदारांची बत्ती गूल करण्यासाठी महावितरणने विशेष पथक निर्माण केले असल्याची माहिती दिली आहे.
राहुरी महावितरण विभागाला वरिष्ठांकडून 100 टक्के वसुलीचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे. यामुळे राहुरीत महावितरणच्या अधिकार्यांनी कंबर कसलेली असून, कर्मचार्यांना कोणत्याही परिस्थितीत वसुली केल्याशिवाय वीज जोडणी न करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे ग्राहकांना राहुरी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणने वसुलीची मोहीम हाती घेतल्यानंतर थकबाकीदार ग्राहकांची धांदल उडाली असून वीजबिल भरण्यासाठी महावितरण कार्यालयात गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, महावितरणचे अधिकारी गायकवाड यांनी थकबाकीदार ग्राहकांनी आपल्याकडील थकित रक्कम तातडीने जमा करून वीज तोडणी मोहिमेतून सुटका करून घेत महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.