होमपेज › Ahamadnagar › दुष्काळी गावांचा पाण्यासाठी लढा

दुष्काळी गावांचा पाण्यासाठी लढा

Published On: Jun 15 2018 1:03AM | Last Updated: Jun 15 2018 12:18AMतळेगाव दिघे : वार्ताहर

भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढवावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सत्याग्रही नेते अ‍ॅड. कारभारी गवळी व इंजि. हरीश चकोर यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने राज्याच्या जलसंपदा खात्याचे सचिव अविनाश सुर्वे यांची भेट घेऊन पाणी संघर्ष तीव्र केला आहे. दरम्यान, मुख्य कालव्यांची वहनक्षमता वाढवावीस, तसेच भोजापूर पूरचारीची दुरुस्ती करावी, यासाठी दुष्काळग्रस्त गावांनी इशारा दिला आहे. 

संगमनेर व सिन्नर तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांना शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी भोजापूर धरणाची उंची वाढवावी, अशी आग्रही मागणी सुरू आहे. याप्रश्‍नी काही दिवसांपूर्वी धरणे आंदोलन करण्यात आले होते. या मागणीचा पाठपुरावा सुरू करण्यात आला असून भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई (मंत्रालय) येथे जलसंपदा खात्याचे सचिव अविनाश सुर्वे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढवावी, मुख्य कालव्याची वहनक्षमता 300 क्यूसेक करावी, तसेच तळेगाव भागातील पूरचारीची दुरुस्ती करावी, याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. 

यावेळी सत्याग्रही नेते अ‍ॅड. कारभारी गवळी, इंजि. हरीश चकोर, डॉ. अभय बंग, अशोक सब्बन, किसन चत्तर, भीमराज चत्तर, विनायक गुंजाळ, अशोक वाकचौरे, रामकृष्ण कांडेकर, विठ्ठल सूरम, चंद्रभान कांडेकर, विवेक धोत्रे, शाहीर कान्हू सुंभे उपस्थित होते. 

भोजापूर धरणाची उंची वाढविल्यास सिन्नर तालुक्यातील 16 तर संगमनेर तालुक्यातील निमोण, सोनोशी, पिंपळे, नान्नजदुमाला, तळेगाव दिघे, काकडवाडी, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, तिगाव या नऊ दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळू शकेल, असे भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलकांचे म्हणणे आहे. याप्रश्‍नी जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे अ‍ॅड. गवळी व इंजि. चकोर यांनी सांगितले.