Mon, May 20, 2019 22:11होमपेज › Ahamadnagar › ड्रेनेज लाईनसाठी फोडला चांगला रस्ता!

ड्रेनेज लाईनसाठी फोडला चांगला रस्ता!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

बुरुडगाव रस्त्यावरील स्वाती कॉलनीजवळ नुकतेच ड्रेनज लाईनचे काम मनपाकडून सुरु करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न यामुळे मार्गी लागणार असला तरी या कामामुळे काही महिन्यांपूर्वीच झालेला चांगला रस्ता फोडावा लागला आहे. त्यामुळे महापालिकेचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, याबाबत नगरसेवक गणेश भोसले यांनी सत्ताधार्‍यांच्या कामकाजावर टीका केली आहे.

स्वस्तिक चौक ते आनंदधाम पर्यंतच्या रस्त्याचे काम अलिकडेच मार्गी लागले. त्यामुळे मनपाच्या व्यापारी संकुलासमोरील रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली. लगतच्या रस्त्यावरही मागील महिन्यातच पॅचिंगचे काम मार्गी लागले होते. त्यामुळे रस्त्याची परिस्थिती काहीशी सुधारलेली असतांनाच पुन्हा एकदा हा रस्ता महापालिकेनेच फोडला आहे. तीन दिवसांपूर्वीच या ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अनेक वर्षांपासून हा प्रश्‍न असल्याचे व तो मार्गी लागल्याचे उद्घाटनावेळी सांगण्यात आले. स्थानिक नगरसेवक, मनपा अधिकार्‍यांनाही याची कल्पना होती, तर काही महिन्यांपूर्वीच रस्त्याचे काम करण्यापूर्वी ड्रेनेज लाईट टाकणे अपेक्षित होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा फोडून लाईन टाकण्यात आल्यामुळे ड्रेनेजचा मार्गी लागला असला तरी मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला आहे. 

ड्रेनेजचे काम झाल्यानंतर या रस्त्याची ‘मलमपट्टी’ही होईल. मात्र, ती किती दिवस टिकणार? आधीच ड्रेनज लाईन टाकली असती, तर रस्ता फोडायची वेळ आलीच नसती. अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागला होता. काही भागात पॅचिंग करुन घेण्यात आले. ही कामे झाल्यानंतर रखडलेल्या कामांबाबत पदाधिकार्‍यांना जाग येत असेल, त्यासाठी परत चांगले रस्ते फोडावे लागत असतील, तर महापौर नेमकी कोणाच्या विकासाला चालना देताहेत? किरकोळ कामांची उद्घाटने करायची, त्यातून शहर विकासाला चालना दिल्याच्या वल्गना करायच्या आणि त्यासाठी चांगल्या रस्त्यांचे वाटोळे करायचे, विकासाला चालना देण्याची ही कोणती पध्दत? असा सवाल नगरसेवक गणेश भोसले यांनी उपस्थित केला आहे.
 


  •