होमपेज › Ahamadnagar › विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 11:08PMराहुरी : प्रतिनिधी

चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेचा सासरी संशायस्पद मृत्यू झाल्यानंतर माहेरकडील लोकांनी सासरच्या दारात अंत्यविधी केल्याने देवळाली प्रवरा येथील इरिगेशन बंगला भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मारुती बाराहाते यांच्या मुलीचा विवाह देवळाली इरिगेशन बंगला येथील महेश सिनारे याच्याशी झाला होता. घटनेबाबत  मुलीचे भाऊ श्रीराम व योगेश बारहाते यांनी माहिती देताना सांगितले की, बहीण संगिता ही मास्टर ऑफ फिलॉसॉफी हे शिक्षण पूर्ण करून पीएचडीचा अभ्यासक्रम करीत होती. लग्नाला 4 महिने पूर्ण होण्यापूर्वीच पती महेश सिनारे यास दारूचे व्यसन असल्याने बहीण संगीता व महेश यांच्यात कुजबूज सुरू होती. महेश सिनारे याने वेळोवेळी त्रास दिल्यानंतर संगीताला माहेरी आणले. काही लोकांनी एकत्र बसून महेशला समजावून सांगितले. यापुढे दारू पिणार नाही व संगीतास त्रास देणार नाही, असा शब्द महेशने सर्वांना दिल्याने संगीताला पुन्हा सासरी आणून सोडले होते.

दरम्यान, दि. 11 रोजी संगीताला उलटी व मळमळीचा त्रास होत होता. सासरकडील लोकांनी तिला देवळाली येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी संगीताला बरे न वाटल्यास राहुरी किंवा नगरला नेण्याची सूचना केली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी संगीताच्या सासरकडील लोकांनी माहेरी संपर्क साधत तुमची मुलगी उठत नाही, तिची प्रकृती ढासळल्याचे सांगितले. माहेरकडील लोकांनी तात्काळ देवळाली येथे दाखल होऊन काल (दि. 12) सकाळच्या सत्रात बेशुद्धअवस्थेत श्रीरामपूर येथे उपचारासाठी नेले. मात्र, तेथे वैद्यकीय उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

शवविच्छेदनानंतर संगीता हिचा मृत्यू रात्रीच झाला असावा, असा प्राथमिक अंदाजही तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिल्याने सासरकडील मंडळींनी संताप व्यक्त केला.त्यांनी मुलगी संगीताचा मृतदेह देवळाली इरिगेशन बंगला येथे आणत सासरकडील मंडळींच्या दारातच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी श्रीरामपूर विभागाचे जिल्हा उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदींसह पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात होता. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.