Thu, Apr 18, 2019 16:19होमपेज › Ahamadnagar › आचारसंहिता आहे, अवांतर विषय नको!

आचारसंहिता आहे, अवांतर विषय नको!

Published On: Jun 09 2018 1:32AM | Last Updated: Jun 09 2018 12:26AMनगर ः प्रतिनिधी

स्थायी समितीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयावर चर्चा करावी. शिक्षक विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अवांतर विषय घेवू नये, अशा शब्दांत अतिरिक्‍त आयुक्‍त विलास वालगुडे यांनी स्थायी समितीच्या सदस्यांना तंबी दिली. मात्र, यामुळे सभापती बाबासाहेब वाकळेंसह सदस्य आक्रमक झाल्यानंतर वालगुडे यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेत मी चर्चा करु नका, असे म्हटले नसल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. आचारसंहिता काळात समस्या मांडण्याही बंदी आहे का? असा सवाल करत प्रशासन स्वतःच्या बचावासाठी आचारसंहितेचा वापर करत असल्याचा आरोप नगरसेवक सागर बोरुडे व विजय गव्हाळे यांनी केला.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या नियुक्‍तीसाठी खर्च व निविदा मागविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यासाठी स्थायी समितीची सभा काल (दि.8) बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलच अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याने जबाबदार अधिकारीच नसतील तर सभा तहकूब करावी, अशी मागणी नगरसेवक बोरुडे यांनी केली. सभापती वाकळे यांनी गैरहजर अधिकार्‍यांची नोंद घेण्याच्या सूचना दिल्या. नगरसेवक बोरुडे, दिपाली बारस्कर यांच्यासह सभापती वाकळे यांनी नालेसफाईच्या मुद्द्यावर प्रश्‍न उपस्थित केले. सावेडी परिसर, पाईपलाईन रोड भागांत अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात नागरिकांच्या घरात पाणी घुसले. नालेसफाईची निविदा का मंजूर झाली नाही? आपत्ती व्यवस्थानाचा आराखडा का झाला नाही? नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर आराखडा करणार का? असे संतप्त सवाल सदस्यांकडून करण्यात आले. अतिरिक्‍त आयुक्‍त वालगुडे यांनी आज निविदा अंतिम होईल असे सांगितले. घनकचरा व्यवस्थापन प्रमुख एन.एस. पैठणकर यांनी छोट्या नालेसफाईचे काम 45 टक्के पूर्ण झाल्याचे निदर्शनास आणले.
सदस्यांनी सावेडी कचरा डेपोतील आगीचा प्रश्‍न उपस्थित करुन अग्निशमन विभागाची वाहने उपलब्ध नसल्याने आग वाढल्याचे सांगितले. गाड्या लवकर आल्या असत्या तर आग भडकली नसती, असे सभापती वाकळे यांनी निदर्शनास आणून दिले. फायर फायटर शंकर मिसाळ यांनी याबाबत खुलासा केल्यानंतर नगरसेवक बोरुडे यांनी शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अतिरिक्‍त आयुक्‍त वालगुडे यांनी अजेंड्यावर असलेल्या विषयावर चर्चा करावी, आचारसंहिता आहे, अवांतर विषय नको, अशी तंबी दिली. त्यावर सदस्यांसह सभापतींनी आक्रमक होत वालगुडे यांना धारेवर धरले. प्रशासनात गतीमानता यावी, नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी आम्ही समस्या मांडतोय. तुम्ही कामे करत नसल्याने आम्हाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. तुमच्या अंगावर आले की प्रशासन बचावासाठी आचारसंहितेचे कारण पुढे करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सदस्यांना चर्चा करु द्या, आचारसंहितेचे आम्ही पाहून घेवू असे सांगत सभापती वाकळे यांनी प्रशासनाला फटकारले. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली.

धोकादायक इमातींवर चर्चा झाल्यावर शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी अपुर्‍या कर्मचारी व अभियंत्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. याचा विचार कोणीही करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. धोकादायक इमारतींच्या प्रश्‍नात जागामालक व भाडेकरुंचे अनेक वाद आहेत. तेथील रहिवाशांना बाहेर काढण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अजेंड्यावरील विषयावर चर्चा होऊन प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

प्रशासकीय कामकाजात गती आणा ः सभापती
महापालिकेत अनेक कामे किरकोळ कारणास्तव रखडली आहेत. प्रशासकीय सोपस्कार पार पाडतांना थातूरमातूर कारणे देवून फायली अडकविल्या जातात. यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याची गरज असून याची सर्वांनी दक्षता घ्यावी. सभेला सर्व प्रमुख अधिकार्‍यांनी उपस्थित रहाणे आवश्यक असून गैरहजर अधिकार्‍यांवर कारवाई प्रस्तावित करावी, असे आदेशही सभापती बाबासाहेब वाकळे यांनी दिले.