होमपेज › Ahamadnagar › डॉक्टरांची कचेरीसमोर निदर्शने

डॉक्टरांची कचेरीसमोर निदर्शने

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 28 2018 11:30PMनगर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने आणलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील खासगी डॉक्टर काल (दि.28) एक दिवसाचा संप पाळला. नगरमधील डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन च्या (आयएमए) वतीनेजिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

निदर्शनात संघटनेचे अध्यक्ष डॉ. सी. डी.मिश्रा, डॉ. शंकर शेळके, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.सतीश सोनवणे, डॉ.धनंजय कुलकर्णी, डॉ.अमित बडवे, डॉ.प्रज्ञा जोशी, डॉ.बन्शी शिंदे, डॉ. कांचन रच्चा, डॉ.राजू चिटगोपिकार, डॉ.गजानन काशीद, डॉ.अशोक नरवडे, डॉ.सोनाली वहाडणे, डॉ.सागर वाघ, डॉ.अमित कर्डे, डॉ.प्रशांत झेंडे, डॉ.नरेंद्र वानखेडे यांच्यासह संघटनेचे सदस्य डॉक्टर सहभागी झाले होते.

सध्या अस्तित्वात असलेल्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियामध्ये 80 टक्के सदस्य निवडून येतात. इतर 20 टक्के सदस्यांची नियुक्ती केली जाते. मात्र नव्या विधेयकानुसार कमिशनवर केवळ पाच जण निवडून जाणार असून बाकी जागा केंद्र सरकार भरणार आहेत. त्यामुळे हे कमिशन संपूर्णत: केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली जाणार असून त्यावर राज्य सरकारचा कुठलाही अधिकार नसेल, त्यामुळे नियामक यंत्रणेचे महत्व जावून ती केवळ सरकारी तालावर नाचणारी यंत्रणा ठरेल त्यामुळे या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे.

डॉक्टरांनी पुकारलेल्या या देशव्यापी संपात तीन लाख डॉक्टर्स सहभागी झाले असून एकट्या महाराष्ट्रातूनच 42 हजार डॉक्टरांनी यासंपात सहभाग घेतला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लुटमारीला चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील डॉक्टरांनी यानॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध केला आहे. हे विधेयक परवा 30 जुलै रोजी संसदेत सादर करण्यात येणार आहे, त्यामुळे हे विधेयक केंद्रसरकारने संसदेत मांडू नये म्हणून डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.