Fri, Jul 19, 2019 15:50होमपेज › Ahamadnagar › तुरीचे सव्वादोन कोटी रुपये मिळेनात

तुरीचे सव्वादोन कोटी रुपये मिळेनात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित असतानाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्ज वसुली जोरात सुरू झाली आहे. मार्चअखेरीमुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले आहे. कर्जाची रक्कम कशी भरावी, याची विवंचना असतानाच शेतकर्‍यांनी हमी भावाने विकलेल्या तुरीचे 2 कोटी 32 लाख 6 हजार रुपये थकल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

राज्य सरकारने नाफेडमार्फत शेतकर्‍यांच्या तुरीची 5 हजार 450 रुपये हमी भावाप्रमाणे खरेदी केली आहे. तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात हे हमी भाव केंद्र  सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर 4 हजार 258 क्विंटल 2 कोटी 32 लाख सहा हजार शंभर रुपयांची तूर खरेदी करण्यात आली. हमी भाव मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या केंद्रावर नोंदणी केली. त्यासाठी सात-बारा उतारा, आधार कार्ड, बँक खात्याची झेरॉक्स आदी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. नोंदणीनंतरही तुरीच्या विक्रीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. नगर बाजार समितीने शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये, म्हणून एसएमएस पाठवून शेतकर्‍यांनी केंद्रावर तूर घेऊन बोलावले. काही शेतकर्‍यांना खराब तुरीचे कारण सांगून माघारी पाठविण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी घरी न नेता थेट व्यापार्‍यांना मिळेल त्या भावात तूर विकून टाकली. यात शेतकर्‍यांना बराच घाटा सोसावा लागला. ज्या शेतकर्‍यांनी हमी भाव केंद्रावर तुरीची विक्री केली. त्यांना तीन महिन्यांपासून पैशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. तुरीच्या पैशासाठी शेतकरी बाजार समितीत हेलपाटे मारत आहेत. परंतु त्यांना सरकारकडून पैसे आले न सल्याचे सांगण्यात येत आहे. आता मार्चअखेरीमुळे सेवा सोसायट्या व बँकांनी कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. कर्जाचे नवे-जुने केले नाही, तर शेतकर्‍यांना व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. 

दरम्यान, शेतकर्‍यांना तुरीची थकित रक्कम मिळावी, यासाठी नगर तालुका बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, उपसभापती रेवण चोभे यांनी संचालक अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, बबन आव्हाड, बन्सी कराळे, दिलीप भालसिंग, सचिव अभय भिसे आदींसह जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारतभूषणपाटील यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. त्यांनी शेतकर्‍यांना तुरीचे पैसे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देण्याचे आश्‍वासन या शिष्टमंडळाला दिले आहे.

Tag : district bank, loan issue, ahmadnagar,


  •