Tue, Jun 18, 2019 23:23होमपेज › Ahamadnagar › ‘पदोन्नत्ती’साठी मनपात ‘वाटा-वाटी’ची चर्चा!

‘पदोन्नत्ती’साठी मनपात ‘वाटा-वाटी’ची चर्चा!

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 10:54PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील कर्मचारी व अभियंत्यांच्या ‘पदोन्नत्ती’साठी अधिकार्‍यांमध्ये ‘वाटा-वाटी’ झाल्याची चर्चा कर्मचारी वर्तुळात सुरु असून कर्मचार्‍यांचे प्रस्ताव डावलून अभियंत्यांच्या प्रस्तावांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मनपा कर्मचारी युनियनने यात लक्ष घालून आक्रमक पवित्रा घेत निवड समितीच्या धोरणावर संशय व्यक्‍त केला आहे. आर्थिक देवाण-घेवाण करुन बेकायदेशीर धोरण राबविल्यास कर्मचारी युनियनतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी ‘पुढारी’शी बोलतांना दिला आहे.

सुमारे 628 कर्मचारी व अभियंत्यांचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडले आहेत. कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्तीच्या प्रस्तावावर प्रत्येक निवड समितीच्या बैठकीत जाणीवपूर्वक त्रुटी काढून शेरे मारले जात आहेत. कर्मचार्‍यांच्या सेवा पुस्तिका, गोपनीय अहवाल, मालमत्ता विवरणपत्रे व इतर आवश्यक सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यातील पात्र व अपात्र ठरणार्‍या कर्मचार्‍यांचे प्राथमिक स्तरावर वर्गीकरणही करण्यात आले आहे. मात्र, निवड समितीच्या उदासीनतेमुळे अद्यापही हे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत. अशातच काही अधिकार्‍यांनी अभियंत्यांच्या पदोन्नत्तीच्या प्रस्तावांसाठी ‘हट्ट’ सुरु केल्याने अधिकार्‍यांमध्येही ‘खटके’ उडण्यास सुरुवात झाली आहे.

कर्मचार्‍यांचे प्रस्ताव डावलून अभियंत्यांच्या प्रस्तावांना प्राधान्य देण्यासाठी ‘वाटा-वाटी’ झाल्याची चर्चाही कर्मचारी वर्तुळात रंगली असून कर्मचारी युनियननेही यात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तत्कालीन आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्तीचे प्रस्ताव एकाच वेळी मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. अधिकारी व युनियनच्या बैठकीतही याबाबत चर्चा होऊन तसा निर्णय झाला आहे. मात्र, सध्या निवड समितीचे अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या प्रस्तावात त्रुटी काढून ते जाणीवपूर्वक लटविण्याचे धोरण अवलंबले आहे. तर स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी अभियंत्यांचे प्रस्ताव प्राधान्याने घेवून त्यासाठी निवड समितीचे आयोजन करण्याचा ‘हट्ट’ धरत आहेत. निवड समितीच्या या बेकायदेशीर धोरणामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष पसरला असून या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी युनियने सुरु केली आहे. कर्मचारी वर्तुळात सुरु असलेल्या ‘वाटा-वाटी’च्या चर्चेची दखल घेवून जिल्हाधिकारी तथा आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष लोखंडे यांनी केली आहे.