Thu, Nov 14, 2019 07:11होमपेज › Ahamadnagar › ‘गोंधळी’ गुरुजींना बजावल्या शिस्तभंग कारवाईच्या नोटिसा

‘गोंधळी’ गुरुजींना बजावल्या शिस्तभंग कारवाईच्या नोटिसा

Published On: Jul 12 2019 1:42AM | Last Updated: Jul 12 2019 12:23AM
नगर : प्रतिनिधी

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी गुरुजींनी घातलेल्या गोंधळाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. यातील 38 ‘गोंधळी’ गुरुजींना शिस्तभंगाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रस्त्यावर गोंधळ घातल्याने जिल्हा परिषदेची बदनामी होऊन, शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सात दिवसांच्या आत त्यांना या नोटिसीला उत्तर द्यावे लागणार आहे.

शिक्षक बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवारी (दि. 9) मतदान घेण्यात आले. मतदानापूर्वी गुरुमाऊली मंडळाचे नेते व बँकचे माजी अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांच्या गटाच्या दोन सदस्यांनी ‘गुरूमाऊली’चे विद्यमान अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी संचालकांची पळवापळवी करण्याचा प्रयत्न केल्याने बँकेसमोरच रस्त्यावर गुरूजींमध्ये राडा झाला होता.

त्यानंतर झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत तांबे गटाच्या साहेबराव अनाप यांची अध्यक्ष म्हणून तर बाळासाहेब मुखेकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. सभेपूर्वी भर रस्त्यात संचालकांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. रोहोकले गटाच्या दोन संचालकांनी ऐनवेळी तांबेंच्या गटाची साथसंगत केल्याने अकोले, संगमनेर, पाथर्डी तालुक्यातील रोहकले समर्थक चांगलेच चिडले. यावेळी दोन्ही गट एकमेकांवर धावून गेल्याचे पाहावयास मिळाले.

सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याचे फोटो सर्व वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले. शिक्षक पदावर काम करत असताना सचोटीने, प्रामाणिकपणे व निष्ठेने कामकाज पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, रस्त्यावरच गोंधळ घातल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाची प्रतिमा जनसामान्यांत मलिन होऊन, शिक्षकी पेशाविषयी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा व वर्तणूक नियम 1967 चे कलम (3) नुसार 38 जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या शिक्षकांवर आता शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

संचालकांसह नेत्यांचाही समावेश

शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी बजावलेल्या नोटिसीमध्ये शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालकांसह गुरुमाऊली मंडळाच्या नेत्यांचाही समावेश आहे. सद्यस्थितीत 38 शिक्षकांचा समावेश असला तरी, त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोटीस देण्यासाठी शिक्षकांच्या नावांचा समावेश करताना वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले फोटो, उपलब्ध व्हिडिओ शूटिंग याचीही मदत घेण्यात आली असून, काही विरोधकांनीही हे फोटो व व्हिडिओ शिक्षण विभागाला पुरविले आहे.