Fri, Aug 23, 2019 23:14होमपेज › Ahamadnagar › डिजिटल सात-बारा महाराष्ट्रदिनी होणार उपलब्ध

डिजिटल सात-बारा महाराष्ट्रदिनी होणार उपलब्ध

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 12:32AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 590  गावांतील सात-बारा उतार्‍यांचे संगणकीकरण पूर्ण  झाले आहे. ऑनलाइन ‘सात-बारा’मध्ये जिल्हा नाशिक विभागात आघाडीवर आहे.आजमितीस फक्‍त 12 गावांतील सात-बारा उतार्‍यांचे काम बाकी आहे. येत्या आठ-दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येत्या महाराष्ट्रदिनी  जिल्हाभरातील नागरिकांना डिजिटल सात-बारा उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे.

राज्य शासनाने ऑनलाईन सात -बारा  उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या अडीच-तीन वर्षांपासून प्रत्येक गावातील सात बारा उतारा संगणकीकृत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक तलाठी तालुक्याच्या ठिकाणी व्यस्त होते. आजमितीस  जिल्ह्यातील नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहुरी आणि श्रीगोंदा या सहा तालुक्यांतील सातबारा संगणकीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. कर्जत, शेवगांव, अकोले,  कोपरगाव, राहुरी, जामखेड, श्रीरामपुर  व संगमनेर  या तालुक्यांतील 12 गावांतील उतार्‍यांचे काम येत्या आठ-दहा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

ऑनलाईन सात-बारामुळे  प्रशासन गतिमान होणार असून,कामात पारदर्शकता देखील येणार आहे. जिल्ह्यात एकूण 1हजार 602 गावे असून, त्यापैकी 1 हजार 590  गावांचे सातबारा ऑनलाइन झाले आहेत. ऑनलाईन उतार्‍यात तलाठ्यांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही. बदल करण्यासाठी मात्र  तहसीलदारांची परवानगी आवश्यक असल्याचे कुळकायदा विभागाचे तहसीलदार आर. एफ. शेख यांनी सांगितले.  ऑनलाईन गावांची संख्या नगर 120, नेवासा 127  पाथर्डी 137, पारनेर 131, राहुरी 96, श्रीगोंदा 115, कर्जत 117, शेवगांव 112, अकोले 189, संगमनेर 169, कोपरगाव 78, राहाता 60, जामखेड 85,  श्रीरामपुर 54.

Tags : Ahmadnagar, digital,  ७/१२ ,Available,  maharashtra Day