Wed, Oct 16, 2019 19:44होमपेज › Ahamadnagar › जावयांच्या धिंडीची परंपरा खंडित

जावयांच्या धिंडीची परंपरा खंडित

Published On: Mar 05 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 11:59PMराहुरी : प्रतिनिधी

धुलिवंदन सणाच्या दिवशी बारागाव नांदूर गावात जावईबापूंची गाढवावरून काढल्या जाणार्‍या धिंडीची परंपरा खंडित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सदरच्या परंपरेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.  धुलिवंदन सणाच्या दिवशी बारागाव नांदूर गावामध्ये जावयांची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा राज्यभर प्रचलित आहे. यामुळे धुलिवंदन येताच गाढवावरून धिंड काढून अंगावर वंगण, गटारीचे पाणी, गळ्यात टायर व झाडूचा तोरा लावून गावात मिरविण्याच्या प्रथेत आपली पंचाईत होणार नाही, याची काळजी घेत गावासह लगतच्या भागात राहणारे जावई अज्ञातस्थळी निघून जातात. यंदाच्या वर्षीही गावासह लगतच्या भागातील 40 ते 50 जावईबापू राहुरी भागातून गायब झाले होते. दोन वर्षांपासून गाढवावरून धिंडीची प्रथा बंद असली तरीही ऐनवेळी फसगत नको, म्हणून जावयांनी गावातून पळ काढला होता. 

दरम्यान, ग्रामस्थांनीही सदरची प्रथा परंपरागत असली तरीही काळ बदलत असल्याचे जाणून घेतले. जावई बापूच्या धिंडीत काही गैरप्रकार घडल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याचे जाणून घेत ग्रामस्थांनी यंदा जावई बापूंची धिंड काढली जाणार नसल्याचे जाहीर केले. गावातून फरार झालेले, तसेच लगतच्या गावातील जावयांनी या निर्णयाचे स्वागत केले. बारागाव नांदूर गावातून सलीम शेख, राजेंद्र कांदळकर, अशोक साळवे, आरिफ देशमुख, रियाज देशमुख, अहमद देशमुख आदी जावयांनी ग्रामस्थांच्या हाती लागू नये यासाठी दोन दिवसांपासून अज्ञातस्थळ गाठले होते.