Fri, Apr 19, 2019 12:30होमपेज › Ahamadnagar › धानोरेत सात एकर उसाला आग

धानोरेत सात एकर उसाला आग

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 29 2018 1:29AMधानोरे : वार्ताहर

राहुरी तालुक्यातील धानोरे येथील चाहूरवस्ती परिसरात उसाच्या क्षेत्राला अचानक लागलेल्या आगीत सुमारे सात एकर उसाचे जळीत झाले  तर तीन एकर क्षेत्रात विखुरलेला ठिबक सिंचनाचा संचही जळाला आहे. उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेमुळे लगतचा सुमारे 25 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले. संबंधित शेतकर्‍यांचे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राहुरी तालुक्यातील धानोरे येथील चाहुर वस्तीनजिक सोनगाव-धानोरे शिवरस्त्यालगत परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. याच ठिकाणी दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अविनाश सुर्यभान दिघे यांच्या उसाला अचानक आग लागली. ऐन उन्हाच्या तडाख्यात दुपारच्या वेळेस लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण करत या परिसरात असणार्‍या उसाच्या क्षेत्रांना वेढा देण्यास प्रारंभ केला.

त्याक्षणी धानोरे येथील शेतकरी विश्‍वनाथ दिघे यांनी तात्काळ घटनेची खबर डॉ. विखे कारखान्याच्या अग्निशमन विभागास कळवली. याच दरम्यान आगीच्या मोठ्या ज्वालांनी भडका घेत अविनाश दिघे यांच्या उसाच्या क्षेत्रासह लगतच असणार्‍या सुनिता शामराव दिघे, कुसूम गोपिनाथ दिघे, भामाबाई रघुनाथ दिघे, पाराजी भानुदास दिघे, सारंगधर रामराव दिघे, नंदू विठ्ठल दिघे या शेतकर्‍यांच्या सात एकर उसाला आगीने भस्मसात करत नंदू दिघे व अविनाश दिघे यांच्या सव्वा तीन एकरातील ठिबक संचही या आगीत जळून खाक केला. तोपर्यंत घटनेची वार्ता या परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत एका बाजूने आग विझविण्यास सुरुवात केली.

या ठिकाणी असणार्‍या निलेश दिघे, अनिल दिघे, सुरेश अनाप, सुभाष ब्राम्हणे, बाळासाहेब दिघे, गहिनिनाथ दिघे, सचिन दिघे, प्रतिक दिघे, सुरेश ढेपे, चंद्रकांत दिघे, शुक्‍लेश्‍वर दिघे, रविंद्र दिघे आदी तरुणांनी प्रसंगावधान राखत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष आग लागलेल्या उसाच्या क्षेत्रात घुसून दुसर्‍या बाजच्या उसाची सावरासावर करत शेजारी असणारा सुमारे 25 एकर ऊस आगीपासून वाचविला. तोपर्यंत घटनास्थळी डॉ. विखे कारखान्याचा अग्निशमन बंबही दाखल झाला. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. घटना घडल्यानंतर प्रवरानगर येथील डॉ. विखे कारखान्याचे शेतकरी विभागाचे सेल मॅनेजर मोरे, शेतकरी अधिकारी चेचरे, दत्तात्रेय कानडे, साहेबराव लोंढे, बी. एम. भुजबळ यांनी घटनास्थळी येत शिल्लक उसाची पाहणी करत राहिलेला ऊस कारखान्याकडे नेण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.