Sat, Feb 23, 2019 16:20होमपेज › Ahamadnagar › आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला कायम

आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला कायम

Published On: Feb 19 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 11:11PMनेवासा : कैलास शिंदे

  नेवासा तालुक्यात विविध प्रश्‍नांसह अनेक विकास कामांच्या शुभारंभावरून आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यातील आरोप- प्रत्यारोपांचा सिलसिला चालूच असल्याने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्यासारखे वातावरण सध्या नेवासा तालुक्यात दिसत आहे. गडाख- मुरकुटे आरोपप्र- प्रत्यारोपांमध्ये ज्ञानेश्वर कारखाना टार्गेट दिसू लागला आहे. 

नेवासा तालुक्यातील विविध कामांचा शुभारंभ सध्या मुरकुटे व गडाख गटांकडून होत आहे. रस्त्यांची कामे अथवा ऊस भावाचा प्रश्‍न असो अशा वेगवेगळ्या कारणांवरून गडाख- मुरकुटे यांच्यामध्ये तसेच दोन्ही समर्थकांमध्ये जाहीर आरोप-प्रत्यारोप होत आहे. हा आरोप- प्रत्यारोपाचा प्रकार काही दिवसांपासून नेवासा तालुक्यात जोरदारपणे होत आहे. आता तालुक्याबरोबरच शहरातही त्याचे लोण आल्याने शहरात वेगवेगळ्या राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे. मध्यंतरी पाणी योजना झाल्यानंतर आता रस्त्यांच्या कामांवरून राजकीय कलगीतुरा रंगला होता. सध्या गडाखांनी एकदा राजकीय आरोप केला की लगेच मुरकुटे यांच्याकडूनही प्रत्यारोप होत आहे. मुरकुटे यांनी राजकीय आरोप केला की लगेच गडाखदेखील त्यास तातडीने प्रतिउत्तर देत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जसे आरोप- प्रत्यारोप होत होते. त्याप्रमाणेच आता नेवासा तालुक्यात राजकीय वातावरण होतांना दिसत आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी आहे. परंतु ऊसतोड, ऊसाचा भाव, विकासकामांचा प्रश्‍न अशा विविध कारणांवरून गडाख व मुरकुटे गटांत राजकीय कुरघोडीचे राजकारण होतांना दिसत आहे. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये  ज्ञानेश्वर साखर कारखाना टार्गेट होतांना दिसत आहे.  ज्ञानेश्वर कारखान्याला आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे सहकार्य असते असा आरोप गडाख गट करीतत आहे.ज्ञानेश्वरवर मोर्चा मुरकुटेंनी मोर्चा काढला तर आपण सहभागी होवू असे आवाहन मुरकुटेंना शंकरराव गडाखांनी दिले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच खुपटी येथे रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी  ज्ञानेश्वर कारखान्याचे वाटोळे  पाहणार्‍या गडाखांनी जनतेची दिशाभूल करू नये असे म्हटले आहे. त्यास तोडीसतोड उत्तर देतांना गडाखांनी आमदार मुरकुटेंना ज्ञानेश्वर कारखान्यांचा एजंटची उपमा दिल्याने शहरात व तालुक्यात चांगलीच राजकीय खळबळ उडाली आहे. असे आरोप- प्रत्यारोप होत असल्याने नेवासा तालुक्यात आता निवडणूका जवळ आल्याची चाहूल दिसू लागली आहे.