Fri, May 24, 2019 06:24होमपेज › Ahamadnagar › खुर्चीच्या महाभारतात विकासकामांचे वस्त्रहरण.  

खुर्चीच्या महाभारतात विकासकामांचे वस्त्रहरण.  

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 17 2018 10:11PMशेवगाव : रमेश चौधरी

अविश्वास ठरावाच्या राजकारणाला विश्वासाने पूर्णविराम मिळाला आहे. या ओढाताढीच्या राजकारणात राष्ट्रवादी व भाजपा अशा दोन्ही पक्षात कमालीची गटबाजी असल्याचे चित्र समोर आल्याने एकत्र आलेला नाराजीचा मोठा गट भविष्यात एकसंघ राहण्यावर प्रश्‍नचिन्ह आहे.

शेवगाव नगरपरिषद अध्यक्षा विरोधात आलेला आणि बहुमताअभावी फेटाळलेल्या अविश्वासदर्शक ठरावाने काय साध्य झाले? या सर्व घडामोडीचा शहरातील विकासावर कोणता परिणाम होणार याचे आत्मचिंतन केल्यास यातून काहीच निष्पन्न होत नसल्याची  वास्तविकता समोर येत आहे. यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत मोठ्या प्रमाणात धुसफूस चालू असल्याचे लक्षात येऊन एकाला हाताशी तर दुसर्‍याला मताशी होत असलेले राजकारण शहरातील सुज्ञ नागरीकांना ज्ञात आहे. झालेल्या घडामोडींचे खापर श्रेष्ठीवर फोडले जात आहे. फक्त तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ याची प्रतिष्ठा करून तड पुरी करण्यासाठी आर्थिक चुराडा करण्यात आला. 

आठ भाजपा, सहा बंडखोर व अपक्ष, सात राष्ट्रवादी व अपक्ष असे नगरपरिषदमध्ये नगरसेवकांचे त्रिकुट बलाबल झाले. दीड महिन्यात होणार्‍या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी आतापासून हालचाली सुरू झाल्या आहेत. अविश्वास दाखल करणार्‍या काही नगरसेवकांना पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वास्तविक या राजकारणाने सर्वसामान्य जनतेत अविश्वास निर्माण होत असून, याला वेळीच आवर घातला असता तर नगराध्यक्ष रामायण घडले नसते. भविष्याच्या राजकारणाचा विचार करता येथे एक एक मत मोलाचे आहे. त्यात कमालीची वजाबाकी होत आहे. गत निवडणुकात 12 मतांच्या इतिहासावरून 55 हजार मतांचा इतिहास घडला आहे. हा इतिहास बदलण्यासाठी वजाबाकीचे बेरजेत रुपातंर करण्याच्या दृष्टीने अंतर्गत गटातटाला खतपाणी घालण्याऐवजी सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी कोणते प्रयत्न होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

नगरपरिषदेत विरोधी भाजपा नगरसेवक वेळेला एकत्र येतात पंरतु त्यांच्यातील अंतर्गत (मुंडे,गांधी) गट दबा धरून सावध भूमिका घेतात. ‘मला न तुला अन्...’  या पद्धतीने त्यांच्यात असणारे राजकारण त्यांना सत्तेपासून बाजूला ठेवीत आहे. अविश्वास ठरावाच्या राजकारणात भाजपाच्या सर्व आठ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले असले तरी हा ठराव बहुमताअभावी समंत होणार नाही याची चाहूल त्यांना लागली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्यातील काही नगरसेवकांनी अगोदरच  नगराध्यक्षांना टिप्स दिल्या होत्या. हे केवळ पदाच्या वादातून गटबाजीचे महाभारत घडत आहे.

दोन्ही पक्षात असणारा हा अंतर्गत कलह पुढे असाच चालू राहण्याची शक्यता असल्याने भाजपा व अविश्वास ठराव दाखल करणारा राष्ट्रवादीचा गट किती दिवस एकत्रित तग धरून राहणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीत तो एकसंघ राहिल्यास पदाचे फलित ठरणार आहे पंरतु भाजपातंर्गत एका गटाच्या पारड्यात पद जाणार असेल तर दुसरा गट विरोधकांचे पारडे जड करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यांच्यातील ही खेचाखेची सत्तेशी बाचाबाची करीत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष बदलाबदलीच्या राजकारणात शहरातील नागरिकांची काय सहानभूती याचा विचार करता स्वच्छ शहर सुंदर शहर नगराध्यक्ष बदलात झाले. स्ट्रिट लाईट मधून आलेला विकास गटारात भूमिगत झाला. शेवगावचा तमाशा बदलत्या मुख्याधिकार्‍यांनी पाहिला, नगरसेवकांचा मान त्यातच राहिला. सुविधा म्हणतात नागरिकांना आपले मत झाले त्याचे खत. असा अडीच वर्षाचा कालावधी लोटला, पुढील अडीच वर्षाचे भविष्य कोण जाणे.

त्या नगरसेवकांवरील कारवाईकडे लक्ष

नगराध्यक्ष अविश्वास ठराव समंत होण्यासाठी त्या बाजूने मतदान करण्याचा व्हिप भाजपा नगरसेवकांनी पाळला, मात्र राष्ट्रवादीने काढलेला हाच व्हिप त्यांच्या काही नगरसेवकांनी गैरहजर राहून त्याचे पालन केले नाही. याबाबत गटनेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.