Tue, Apr 23, 2019 00:19होमपेज › Ahamadnagar › दिल्ली वजनाची काँग्रेसमध्ये स्पर्धा

दिल्ली वजनाची काँग्रेसमध्ये स्पर्धा

Published On: Jan 06 2018 1:17AM | Last Updated: Jan 05 2018 10:55PM

बुकमार्क करा
राज्यासह देशातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे स्वप्न दाखविले होते. या पार्श्‍वभुमीवर देशामध्ये बॅकफूटवर गेलेल्या भारतीय काँग्रेस पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केले. त्यासाठी नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची प्रचंड मेहनत ही जमेची बाजू असली तरी पक्ष निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले. दरम्यान पक्षातील या चैतन्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्‍वभुमीवर राहुल गांधी यांनी राज्यातील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलावून राजकीय आढावा घेतला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात सध्या दिल्ली दरबारी ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे वजन वाढल्याची चर्चा स्पर्धेत रूपांतरीत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

राज्याच्या राजकारणात काँग्रेसचे ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. बाळासाहेब थोरात हे तुल्यबळ व वजनदार नेते असल्याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नाही. त्यामुळेच आजपर्यंतच्या मंत्री मंडळात दोघांनाही महत्वाचे खाते देण्यात आली. नव्हे अहमदनगर जिल्ह्यातून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दोघांचेही नाव आघाडीवर असल्याचे चित्र अनेकदा अनुभवायास मिळाले आहे.
आज राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकांच्या भूमिकेत असली तरी राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून ना. विखे यांची कारकिर्द जिल्ह्यासाठी भूषणावह ठरली आहे. तीन वर्षापूर्वी राज्य व देशात सत्तांतर झाल्यानंतर अडीच वर्षाचा काळ विरोधकांसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अवस्थेत गेला. ना केंद्रात, ना राज्यात काँग्रेसला चमकदार कामगिरी करता आली. परंतु गुजरात निवडणुकीपासून भाजपा विरोधकांना चुचकारून त्यांची एकमोट बांधण्यात काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना जसे यश मिळाले. तसेच यश राज्यात ना. विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेसला विश्‍वासात घेण्यात मिळाले आहे.
राज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर प्रारंभी भाजपाला बाहेरून पाठींबा देण्याची भाषा करणारी राष्ट्रवादी काँग्रेस आता धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर मित्रपक्ष काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी आग्रही आहेत. सत्ताधार्‍यांच्या विरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलनासह सर्वच आघाड्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस खांद्याला खांदा लावून एकजीवाने लढाई करीत असल्याचे चित्र महाराष्ट्र अनुभवतो आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून काम करणारे आ. बाळासाहेब थोरात यांना राजकीय लाभ झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसशी वैर घेवून ना. राधाकृष्ण विखे यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. त्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील आशिया खंडातील सहकारी तत्वावर चालणार्‍या एकमेव मुळा-प्रवरा विद्युत सहकारी संस्थेचा बळी गेल्याचा इतिहास ताजा आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष फारसा लाभाचा नसल्याची बाब ना. विखे व आ. थोरात यांच्या लक्षात आलेली आहे. म्हणूनच आ. थोरातांपाठोपाठ ना. विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून पक्षाला सकारात्मक विकासाचा आक्रमक चेहरा मिळवून देण्यात यश मिळविले आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसच्या या वजनदार नेत्यांचे ‘विळा-भोपळ्यांचे नाते कार्यकर्त्यांच्या मानेवर तलवारी प्रमाणे सदैव टांगते राहिलेले आहे.

जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकटीसाठी ही दोन नेते एकत्र आले तर जिल्ह्याच्या राजकारणाची कूस बदलण्याची क्षमता यांच्यात असल्याचे कार्यकर्ते खाजगीत सांगतात. परंतु प्रत्यक्षात आपआपल्या नेत्याकडे आपली निष्ठा व्यक्त करताना स्वत:चे वजन वाढावे म्हणून दोन्ही नेत्यांमधील दुरावा कायम ठेवण्यात धन्यता मानतात. याची पक्षाला जिल्ह्यात मोठी किंमत मोजावी लागत असली तरी दोन्ही नेत्यांची दिल्लीतील वाढत्या वजनाची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

आ. बाळासाहेब थोरात यांनी गुजरात निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणून केलेली उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या मितभाषी, विनम्र नेतृत्वाला कलाटणी देणारी ठरली आहे. पक्षाचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आ. थोरात यांची हिमाचल प्रदेशच्या पक्ष बांधणीसाठी ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्याबरोबर निरीक्षक म्हणून वर्णी लावल्याने थोरात समर्थक कार्यकर्ते उत्साहाने प्रफुल्लीत झाले आहेत.
दरम्यान दि. 4 जानेवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलविले. समवेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना बोलावून राज्यातील राजकारणाची दिशा ठरविली. त्यामुळे जिल्ह्यातील विखे समर्थक कार्यकर्तेही भलतेच फॉर्मात आले आहेत.

ना. विखे व आ. थोरात यांचे सध्या दिल्ली दरबारी वाढते वजन लक्षात घेता उद्या राज्यात सत्तांतर झाले तर मुख्यमंत्री म्हणून दोघांमधील एकाची वर्णी लागेल, असे ठणकावून सांगण्याची कार्यकर्त्यांची स्पर्धा जिल्हावासियांना आनंददायी वाटते आहे. सन 2019 च्या निवडणुकीत नेमके काय होणार? हे सांगणे आज जरी अवघड वाटत असले तरी जिल्ह्यातील हे दोन नेते महत्वपूर्ण भूमिका बजावणार हे कमी नव्हे. परंतु या दोघांमधील ‘अबोला’ दूर करण्यासाठी खा. राहुल गांधी केव्हा बोलतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.