Mon, Aug 19, 2019 07:22होमपेज › Ahamadnagar › कार-मालट्रक अपघातात चुलता-पुतण्या मृत्यूमुखी

कार-मालट्रक अपघातात चुलता-पुतण्या मृत्यूमुखी

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:34PMपारनेर : प्रतिनिधी     

नगर-पुणे महामार्गावर पुण्याकडे जाणार्‍या कारने पुढे चाललेल्या मालमोटारीस जोराची धडक दिल्याने कारमधील चुलता-पुतण्याचा करूण अंत झाला. तर या अपघातात कारचालक मेहुणा गंभीर जखमी झाला. नगर तालुक्यातील चास शिवारात रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला प्रशांत गणपत मापारी (29) व सुमित संदीप मापारी (11, दोघे रा. राळेगणसिद्धी ता. पारनेर) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चुलता-पुतण्याची नावे आहेत. कार चालवित असलेले रतन कर्डिले (रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) हे अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नगर येथील रुणालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्‍काचूर झाला. 

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, जम्मू येथे सीमा सुरक्षा दलात नोकरीस असलेले संदीप गणपत मापारी (32 रा. राळेगणसिद्धी) हे महिनाभराची सुट्टी संपल्यानंतर रविवारी रात्री 8.30 च्या जम्मू-तावी एक्सपेे्रस रेल्वेने पुन्हा रूजू होण्यासाठी निघाले होते. त्यांना नगर येथील रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी संदीप यांचे धाकटे बंधू प्रशांत, त्यांच्या बहिणीचे पती रतन कर्डिले हे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राळेगणसिद्धीहून निघाले. मेहुण्याला नगर येथे सोडण्यासाठी रतन कर्डिले हे त्यांचे वाडेगव्हाण येथील मेहुणे संदीप शेळके यांनी अलिकडेच खरेदी केलेली वॅगन आर कार (क्र.एम.एच.16 बी.वाय.5674) घेऊन आले होते. चारचाकी वाहन असल्यामुळे जवान संदीप यांचा मुलगा सुमित यानेही वडिलांना सोडण्यासाठी नगरपर्यंत येण्याचा हट्ट धरला. कारमध्ये जागा असल्याने इतर तिघांनी सुमित यास सोबत घेतले. ते चौघे नगर रेल्वे स्थानकावर जम्मू-तावीच्या आगमनापूर्वी पोहचले. संदीप यांना निरोप देऊन रतन कर्डिले, प्रशांत व सुमित मापारी पुन्हा कारमधून राळेगणसिद्धीकडे निघाले होते. 

नगर-पुणे महामार्गावर चास ओलांडल्यानंतर अदित्यनराजे हॉटेलजवळच्या पेट्रोलपंपासमोर कारने पुढे चाललेल्या मालमोटारीस जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा अक्षरशः चक्‍काचूर झाला. अपघातात चालकाशेजारी बसलेले प्रशांत मापारी हे जागीच मृत पावले. तर गंभीर जखमी झालेल्या सुमित मापारी यास नगर येथे उपचारासाठी नेतानाच त्याची प्राणज्योत मालवली. चालक रतन कर्डिले हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघात झाल्यानंतर चासचे सरपंच, परिसरातील हॉटेल तसेच पेट्रोलपंप चालकांनी जखमींना मदत करण्यासाठी मोठी मदत केली. नगर तालुका पोलिसांनी राळेगणसिद्धी येथे नातेवाईकांशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. काल (दि.11) सकाळी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी राळेगणसिद्धीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, जम्मूकडे निघालेले जवान संदीप मापारी यांना या अपघाताची माहिती कळविण्यात आल्यानंतर त्यांनी भुसावळ येथे उतरून पुन्हा राळेगणसिद्धीकडे प्रयाण केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राळेगणसिद्धी परिवाराचे सदस्य यावेळी उपस्थित हाते. या दुर्घटनेमुळे राळेगणसिद्धीत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.