होमपेज › Ahamadnagar › खुनापूर्वी सुनेचे भानुदास कोतकरांशी संभाषण

खुनापूर्वी सुनेचे भानुदास कोतकरांशी संभाषण

Published On: Apr 25 2018 12:55AM | Last Updated: Apr 24 2018 10:38PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडापूर्वी नगरसेविका सुवर्णा कोतकर यांचे सासरे भानुदास कोतकर यांच्याशी बोलणे झाले. त्यानंतर नगरसेवक विशाल कोतकर याने संदीप गुंजाळ याला फोन केल्याचे पोलिस चौकशीतून पुढे आले आहे. तो संवाद नेमका काय होता, याचा तपास करायचा असल्याचे तपासी अधिकार्‍यांनी काल (दि. 24) न्यायालयासमोर सांगितले. दरम्यान, सूत्रधार विशाल कोतकर याला मंगळवारी पहाटे कामरगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. त्याच्यासह रवि खोल्लम याला शुक्रवारपर्यंत (दि. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

केडगाव हत्याकांडातील आता थेट कोतकर कुटुंबीयांचे कनेक्शन पुढे आल्याने नवा ट्विस्ट आला आहे. पहाटे कामरगाव येथून पकडलेला नगरसेवक विशाल कोतकर व पोलिस कोठडी संपलेल्या रवि खोल्लम या दोघांना काल (दि. 24) दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. सु. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात बोलताना तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले की, ‘रवि खोल्लम याला मयत संजय कोतकर याने भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ, दमदाटी केली. हा संवाद खोल्लम याने रेकॉर्डिंग केला होता. दमदाटी करून संजय कोतकर हे खोल्लम याच्या घरी निघाले होते. या धमकीनंतर खोल्लम याने नगरसेवक विशाल कोतकर याला घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी विशाल हा भानुदास कोतकर यांच्या घरी होता. खोल्लम हा बी. एम. कोतकर याच्यासमवेत भानुदास कोतकर यांच्या घरी गेला. हे कॉल रेकॉर्डिंग सुवर्णा कोतकर यांना ऐकविण्यात आले. त्यांनी सासरे भानुदास कोतकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर नगरसेवक विशाल कोतकर याने संदीप गुंजाळ याला फोन केला व काही वेळानंतर खुनाची घटना घडलेली आहे.’ 

लांडे खून प्रकरणात जामिनावर जिल्ह्याबाहेर वास्तव्य करणार्‍या भानुदास कोतकर याच्यासोबत सून सुवर्णा कोतकर यांचे काय संभाषण झाले, याचा तपास करायचा आहे. त्या कटात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याची चौकशी करायची आहे. गुंजाळ याने विशाल कोतकर याच्या सांगण्यावरून खून केल्याचे पोलिस कोठडीत असताना सांगितलेले आहे. त्यामुळे कोतकर याच्याकडे गुंजाळ याने दिलेल्या जबाबाबाबत चौकशी करायची आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार विशाल कोतकर हा गुन्ह्याचा मुख्य आरोपी आहे. रवि खोल्लम याच्याशी मयताचे वाद झाल्यानंतर खून झालेला आहे. त्यामुळे विशाल कोतकर व रवि खोल्लम यांच्यात समोरासमोर तपास करायचा आहे. कोतकर याच्याकडून गुन्ह्यावेळी वापरलेला मोबाईल हस्तगत करायचा आहे.

गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असल्याने सखोल तपासासाठी नव्याने अटक केलेल्या विशाल कोतकर याला सात दिवस व मंगळवारी पोलिस कोठडी संपलेल्या रवि खोल्लम याच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी तपासी अधिकारी पवार व सरकारी वकील अ‍ॅड. सीमा देशपांडे यांनी न्यायालयात केली.आरोपीच्या वकिलांनी आरोपींच्या बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत (दि. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

Tags : Ahamadnagar,  daughter in law, Talks, Bhanudas Kotkar, before,  murder