Tue, Jul 23, 2019 16:41होमपेज › Ahamadnagar › दैठणेगुंजाळमध्ये चोरट्यास चोप

दैठणेगुंजाळमध्ये चोरट्यास चोप

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 11 2018 11:43PMपारनेर : प्रतिनिधी     

तालुक्यातील दैठणेगुंजाळ येथे चोरी करून पसार होणर्‍या चौघा चोरट्यांपैकी एकास पकडून ग्रामस्थांनी काल (दि.11) पहाटे बेदम चोप दिला. मारहाणीत जखमी झालेल्या चोरट्यावर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मच्छिंद्र जासूद यांच्या घरातील 42 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात व पसार होण्यात इतर तिघे चोरटे यशस्वी ठरले. जासूद कुटुंबीय गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास जेवण केल्यानंतर घरास कडी लाऊन बाहेर झोपले होते. फिर्यादी मच्छिंद्र यांचे आई, वडील एक मुलगा व दोन मुली ओट्यावर, तर घरापासून काही अंतरावर शेतात फिर्यादी मच्छिंद्र त्यांची पत्नी व मुलगा झोपले होते. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मच्छिंद्र यांना आवाजामुळे जाग आली. त्यावेळी घराच्या ओट्यावर त्यांना बॅटरीचा उजेड दिसला. त्याच वेळी त्यांचा मुलगाही जागा झाला. त्याने बॅटरीच्या मदतीने नेमका प्रकार काय आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला असता, घरासमोर चार अनोळखी इसम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ चोरटे आले असल्याबाबत आरडा ओरड करण्यास सुरूवात केली. वडिलांच्या आवाजाने जागा झालेला व ओट्यावर झोपलेला मच्छिंद्र यांचा मुलगा अमोल याची एका चोरट्याशी झटापट झाली. त्यात तो जखमी झाला. 

मच्छिंद्र व इतरांनी आरडाओरडा केल्याने किरण बाबासाहेब गुंजाळ, अनिल भाउसाहेब खरमाळे, साहेबराव बापू गुंजाळ, अप्पासाहेब कोंडीभाउ गुंजाळ, दीपक दत्तात्रय गुंजाळ, दादासाहेब साहेबराव घोलप, नीलेश विनायक जासूद, अशोक भगवान जासूद, बाबासाहेब नामदेव भोर, अनिल रंगनाथ झावरे यांच्यासह इतर 20 ते 25 लोक तेथे जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. एका जोरट्यास पकडण्यात मात्र तरुणांना यश आले. पकडण्यात आल्यानंतर चोरटा हल्‍ला करण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर तरुणांनी त्यास बेदम चोप दिला. हा प्रकार सुरू असताना काही ग्रामस्थांनी पारनेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस ठाण्याचे वाहन घटनास्थळी पोहचल्यानंतर पकडण्यात आलेल्या चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या चोरट्यास पहाटेच पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपाचरासाठी दाखल करण्यात आले. जासूद यांच्या घरातील 20 हजार रोख व 22 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने इतर तिघांनी चोरून नेले. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत पकडण्यात आलेल्या चोरटा हा पाडळी रांजणगाव (ता. पारनेर) शिवारातील रहिवासी असून, शरद कैलास काळे (वय 28) असे त्याचे नाव आहे. तालुक्यात सध्या भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी झालेल्या चोर्‍यांतील एकाही घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही.