होमपेज › Ahamadnagar › रस्तालूट करणारा चोरटा गजाआड

रस्तालूट करणारा चोरटा गजाआड

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 10:59PMनगर : प्रतिनिधी

बुरुडगाव रस्त्यावरील माणिकनगरमध्ये तरुणास मारहाण करुन लुटणारा केडगाव येथील चोरटा गणेश शिवाजी लोखंडे (वय 20, रा. सोनेवाडी रोड, केडगाव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले. वाडिया पार्क परिसरात आरोपीस पकडून त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल व वाहन हस्तगत केले. याच गुन्ह्यातील इतर दोन अल्पवयीन चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश लोखंडे व इतर दोन अल्पवयीन चोरट्यांनी 4 मे रोजी माणिकनगर येथे अलाबद्दी बैतुल मेडल (वय 26, रा. भोसले आखाडा, नगर) यांना मारहाण करुन लुटले होते. याबाबत अलाबद्दी यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्ह्याचा कोतवाली व एलसीबी पोलिस समांतर तपास करत असताना यातील संशयित चोरटे वाडिया पार्क परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे व कैलास देशमाने, पोलिस सबइन्स्पेक्टर श्रीधर गुठ्ठे व सुधीर पाटील, हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलिस नाईक संदीप घोडके, आण्णा पवार, रवींद्र कर्डिले, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, दत्ता गव्हाणे, दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, विजय ठोंबरे, कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे यांनी वाडिया पार्क परिसरात सापळा लावला.

यावेळी तीन संशयित ज्युपिटर मोपेड दुचाकीवर येताना दिसले. त्यांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. यावेळी गणेश लोखंडेला पोलिसांनी पकडले. तर दोघे अल्पवयीन अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. लोखंडे याने रस्ता लुटीचा गुन्हा इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासासाठी लोखंडेला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.