होमपेज › Ahamadnagar › कैलास गिरवले यांचा अखेर मृत्यू

कैलास गिरवले यांचा अखेर मृत्यू

Published On: Apr 18 2018 1:43AM | Last Updated: Apr 18 2018 12:23AMनगर : प्रतिनिधी

कोठडीत असताना प्रकृती बिघडल्याने ‘ससून’ला हलविलेल्या नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी (दि. 16) रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आला आहे. मात्र, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

गिरवले यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत असताना झालेला असल्यामुळे या अकस्मात मृत्यूप्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सुरू केला आहे. मंगळवारी (दि. 17) दुपारपासूनच सीआयडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. सीआयडीचे पोलिस अधीक्षकांनीही मंगळवारी सायंकाळी नगरला धाव घेतली आहे. पोलिसांच्या मारहाणीत गिरवले यांचा मृत्यू झालाचा आरोप करीत नातेवाईकांनी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाणे व नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. ‘सीआयडी’ चौकशीच्या लेखी आश्‍वासनानंतर नातेवाईक अंत्यविधीला गेले.  

याबाबत माहिती अशी की, 7 एप्रिल रोजी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला करून धक्काबुक्की व तोडफोड केल्याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कैलास रामभाऊ गिरवले (वय 55, रा. अमनपाटील रोड, माळीवाडा) यांना 8 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली होती. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ती संपल्यानंतर दि. 10 रोजी न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला होता. त्यामुळे गिरवले यांची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

याच दरम्यान, दि. 10 एप्रिल रोजी गिरवले यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 इ अंतर्गत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी गिरवले यांना या गुन्ह्यात वर्ग करून रात्री पावणेअकरा वाजता अटक करण्यात आली. शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत (दि. 15) पोलिस कोठडी सुनावली होती. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता गिरवले यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना ससूनला हलविले. 

गिरवले यांना ससूनला हलविल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी कागदपत्रे पोलिसांनी न्यायालयात सादर केली होती. त्यावरून गिरवले यांना 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ससूनला उपचार घेत असताना गिरवले यांना रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशाशिवाय रुबीला हलविण्यास ससूनच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी विरोध दर्शविला. नातेवाईकांच्या मागणीनुसार सोमवारी (दि. 16) न्यायालयाने रुबी हॉस्पिटलला हलविण्यास परवानगी दिली. दुपारी एक वाजता रुबी येथील वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक ससूनला दाखल झाले. वैद्यकीय तपासणी केली असता रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने रुबीला हलविता येणार नाही, असे डॉक्टरांनी तोंडी सांगितले. सायंकाळी सव्वासहा वाजता रुबीचे डॉ. अश्‍विल पिल्ले यांनी रुग्णाला हलविता येणार नसल्याचा लेखी अहवाल दिला. त्यानंतर उपचार सुरू असताना रात्री पावणेअकरा वाजता ससूनच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी गिरवले यांना मयत घोषित केले. 

उत्तरीय तपासणीत वैद्यकीय अधिकार्‍यांनी गिरवले यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचे बंधू बाबासाहेब गिरवले यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप करून मारहाण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी (दि. 17) दुपारी गिरवले यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयताचे नातेवाईक कोतवाली पोलिस ठाण्यात!

मयत कैलास गिरवले यांची पत्नी, बहीण, मुलगी व इतर नातेवाईक मंगळवारी दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले. मारहाण करणार्‍या पोलिसांविरुद्ध जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिस कोठडीत असलेले आ. संग्राम जगताप यांना ‘कोतवाली’त आणण्यात आले. पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, सोमनाथ वाघचौरे, सुदर्शन मुंढे आदी वरिष्ठ अधिकार्‍यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. तक्रार अर्ज दाखल करून घेत तो चौकशीसाठी ‘सीआयडी’कडे सोपविण्यात येईल, असे पोलिसांनी आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईक पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. 

 

Tags : ahamadnagar, ahamadnagar news, corporator, kailas giravle, passes away,