Tue, Jul 23, 2019 07:10होमपेज › Ahamadnagar › नगर जिल्ह्यात १३ दूध संघांवर नियंत्रकांचा‘वॉच’

नगर जिल्ह्यात १३ दूध संघांवर नियंत्रकांचा‘वॉच’

Published On: Aug 11 2018 1:18AM | Last Updated: Aug 10 2018 11:49PMश्रीरामपूर ः प्रतिनिधी

सरकारने दूधउत्पादकांना  गुणवत्तेनुसार प्रतिलिटर 25 रुपये भाव मिळावा, याकरिता जिल्ह्यातील सहकारी 5 संघ, खासगी 3 संघ व पावडर निर्मिती करणार्‍या 5 प्लॅन्ट अशा 13 ठिकाणी शासन नियंत्रक म्हणून प्रत्येकी एक कर्मचारी नियुक्त केला आहे. मात्र, उर्वरित खासगीसह सरकारी व मल्टिस्टेट अशा तब्बल 150 छोट्या-मोठ्या दूध संघांवर अशा नियंत्रकांचा ‘वॉच’ नसल्याने अनेक शेतकर्‍यांसाठी 25 रुपयांचा हा दर मृगजळ ठरण्याची भीती आहे.

जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे सहकारी 12 दूध संघ, खासगी 145 दूध संघ, तसेच मल्टिस्टेट 6 संघांच्या माध्यमातून दैनंदिन 25 लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. हे दूध पुणे, मुंबईसह नागपूर व अन्य ठिकाणी पाठविले जाते. त्यामुळे कोल्हापूरच्या पाठोपाठ नगरच्या दुधाची मागणी शहरी भागात वाढताना दिसत आहे. असे असताना दुधाच्या दरात मात्र मध्यंतरी झालेली घसरण लक्षात घेता अनेक आंदोलने झाली. शहरी भागाचा दूधपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी सरकारने 3.5 फॅट व 8.5 डिग्री लक्षात घेऊन 25 रुपये दर देण्याच्या सूचना केल्यानंतर हे आंदोलन शमले होेते. या निर्णयाचे दूधउत्पादकांनीही स्वागत केले. तसेच हा दर शेतकर्‍यांना मिळावा, याकरिता प्रशासनाने मोठ्या संघांवर शासन नियंत्रक म्हणून एका कर्मचार्‍याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. 

यानुसार संगमनेर, राहाता, राहुरी, अकोले व बाभळेश्‍वर या पाच सहकारी दूध संघांवर नियंत्रक नियुक्त करण्यात आला. तसेच खासगी जय हनुमान (निमगाव जाळी), साईकृपा (काष्टी) व चितळकर डेअरी ( नगर तालुका), या ठिकाणीही वॉच ठेवण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले. याशिवाय पावडर प्लॅन्ट असलेले प्रभात (श्रीरामपूर), मळगंगा (निघोज), एस.आर.थोरात (संगमनेर), व्ही.आर. एस. फूड (नेवासा), आणि पतंजली (नेवासा फाटा) या पाच ठिकाणीही अधिकृत कर्मचारी नियुक्त करून दूधउत्पादकांना निर्धारित दर देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे दुग्धउत्पादकांनाही त्यांच्या प्रतवारीनुसार 25 रुपयांचा दर मिळू लागला आहे. 

एकीकडे ज्या संघांवर वॉच आहे, त्या दूध संघाकडे दूध घालणार्‍या संकलन केंद्रातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 25 रुपयांचा दर वर्ग केला जात आहे.  मात्र, तेथे 3.2 पासून 3.5 पर्यंतचे दूध स्वीकारले जात आहे. यापेक्षा कमी प्रतवारी असलेले दूध शासन नियंत्रक स्वीकारत नाही, अशावेळी संबंधित दूध हे नियंत्रक नसलेले खासगी संघ कमी भावात स्वीकारत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे  सहकारी, खासगी, मल्टिस्टेटच्या 150 पेक्षा अधिक संघावर सरकारचे कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे. 

गावातील छोटे-मोठे दूध संकलन केंद्र चालक हे अनेक खासगी व सहकारी दूध संघांना दूध पाठवतात, मात्र त्याठिकाणी अधिकारी नियुक्त नसल्याने शेतकर्‍यांनी उच्च प्रतीचे दूध घालूनही तेथे मात्र रहस्यमयरित्या प्रतवारी घसरते आणि 22 रुपयांचाच भाव शेतकर्‍यांच्या पदरात पडतो. जिल्ह्यातील सर्वच दूध संघावर शासन नियंत्रक अचानक भेटी देतात. मात्र, मुळातच फॅट मशीन रिव्हर्स असल्याने शेतकर्‍यांचे खिसे कापले जात आहेत.