Fri, May 24, 2019 08:53होमपेज › Ahamadnagar › जलयुक्त शिवारची कामे लवकर पूर्ण करा

जलयुक्त शिवारची कामे लवकर पूर्ण करा

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:33AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्याचे जलयुक्त शिवार योजनेतील काम समाधानकारक आहे. 2017-18 सालातील जलयुक्त शिवारची अपूर्ण असलेली कामे येत्या 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी दिले.डवले यांनी काल (दि. 10) जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, विभागीय वन अधिकारी आदेश रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या 2017-18 मधील जवळपास 80 टक्के कामे प्रगतीपथावर आहेत. पुढील काळात अनेक निवडणुका होणार असल्याने आचारसंहितेत कामे करतांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे 2017-18 मधील कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करावे. 2018-19 मधील 248 गावात कामे सुरु करावयाची आहेत. या कामांनाही जास्त उशीर न करता पुढील आठवड्यात किमान काही गावात तरी कामे सुरु करण्याचे निर्देश डवले यांनी केले.

मागेल त्याला शेततळे योजनेच्या जिल्ह्यातील कामांवर डवले यांनी समाधान व्यक्त केले. झालेल्या कामांचे ‘जिओ टॅगिंग’ 85 टक्के पूर्ण झाले असून, ते टॅगिंग 100 टक्के करावे. चालू आर्थिक वर्षातील जलयुक्त शिवारच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल नसला तरी कामे सुरु करण्यास शासनाने मुभा दिली आहे. आधी कामे सुरु करून नंतर प्रकल्प अहवाल मंजूर करून घेण्याचे निर्देशही डवले यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.