Sat, Jun 06, 2020 08:52होमपेज › Ahamadnagar › कर्जत तालुक्यामध्ये कडकडीत बंद

कर्जत तालुक्यामध्ये कडकडीत बंद

Published On: Jan 04 2018 12:59AM | Last Updated: Jan 03 2018 10:03PM

बुकमार्क करा
कर्जत : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ काल (दि.3) कर्जतसह राशीन, कुळधरण येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून सर्व व्यवहार बंद होते. कर्जत बसस्थानकावरून एकही एसटी धावली नाही. शाळा, महाविद्यातील विद्यार्थ्यांनाही घरी सोडण्यात आले. त्यानंतर भीम सैनिकांनी मोर्चाने जाऊन प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. 
कोरेगाव भीमा येथील घटनेचे तीव्र पडसाद कर्जत तालुक्यामध्ये उमटले. सर्वच जाती-धर्माच्या नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच भीम सैनिकांनी तालुका बंदची हाक दिली. त्यास सकल मराठा समाजाने पाठींबा जाहीर केला.

एसटी बंदमुळे नागरिकांचे हाल

काल सकाळपासून शहरात व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बसस्थानकावर असलेल्या सर्व एसटी गाड्या रात्रीच संबंधित डेपोत पाठविण्यात आल्या. मात्र ग्रामीण भागामध्ये मुक्‍कामी असलेल्या एसटी सकाळी कर्जत येथे आल्या. त्यांना त्यानंतर डेपोमध्ये पाठविण्यात आले. दिवसभर एकही बस स्थानकात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

शाळा-महाविद्यालयेही बंद

सकाळपासूनच दुकाने व एसटी बस सेवा बंद होती. मात्र शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये भरली होती काही महाविद्यालया चाचणी परीक्षा पण होत्या मात्र दहा वाजता सर्व षाळा आणि महाविद्यालये सोडून देण्यात आली यामुळे विद्यार्थ्याच्या परीक्षा पण झाल्या नाहीत. 

भीम सैनिकांचा मोर्चा

कर्जत शहरातून भीम सैनिकांनी निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिस ठाण्यावर नेण्यात आला. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे आणि तहसीलदार किरण सावंत यांना निवेदन देण्यात आले. समाज कंटकांवर अ‍ॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करावा, घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, तसचे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनावर रोहन कदम, सोमनाथ भैलुमे, प्रवीण भैलुमे, सतीश अल्हाट, सोहन कदम, गोदड समुद्र, अनिल गोरे, देवराम खरात, सागर समुद्र, अंकुश भैलुमे, भानुदास पवार, विनायक जाधव, महेश धावडे, सुमित भैलुमे, दादा थोरात, कुंदन भैलुमे, बाळासाहेब भैलुमे, संजय सुर्वे यांच्या सह्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी मुंडे यांनी निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्‍वासन दिले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त 

बंदच्या पार्श्‍वभूमीवर कर्जत शहरामध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यात जमावबंदी लागू केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वंसत भोये यांनी बंदोबस्त ठेवला. तालुक्यातील राशईन व कुळधरण येथेही बंद पाळण्यात आला.  बसस्थानकावर राज्य राखीव दालाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती.