Wed, Jul 08, 2020 00:20होमपेज › Ahamadnagar › गाजदीपूरला होणार पक्का रस्ता

गाजदीपूरला होणार पक्का रस्ता

Published On: May 18 2018 1:14AM | Last Updated: May 17 2018 10:49PMपारनेर : प्रतिनिधी 

शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या अतिदुर्गम गाजदीपूर या गावाला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 70 वर्षांनी रस्ता मिळणार आहे! आ. विजय औटी यांच्या पाठपुराव्यानंतर अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी या रस्त्यासाठी 50 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली.

गाजदीपूर हे गाव शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले दुर्गम गाव असून, गावात किराणा दुकान अथवा पिठाची गिरणीही नाही. परिणामी दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी आदिवासी बांधवांना पायपीट करून वडगाव सावताळ येथे जावे लागते. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाले, तरी या दुर्गम गावस जोडणार्‍या रस्त्याचे कामच झालेले नव्हते. आ. औटी यांनी या गावास भेट देऊन आदिवासींच्या भावना समजून घेतल्या. त्यावेळी ग्रामस्थांनी वडगाव सावताळला जोडणार्‍या रस्त्याची मागणी केली. औटी यांनी संबंधित अधिकार्‍यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्यानंतर रस्त्याचा बराच भाग वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याची बाब पुढे आली. आदिवासी बांधवांच्या व्यथा दूर करायच्याच, असा चंग बांधून आ. औटी यांनी या रस्त्याच्या परवानगी तसेच निधीसाठी वन विभागाकडे मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू केला. मंत्री मुनगंटीवार यांनी वेळोवेळी भेट घेऊन या प्रस्तावाची फाईल वन विभागाच्या मुख्य सचिवांपर्यंत कशी पोहचेल, याची काळजी घेतली. 

सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर गुरुवारी सकाळी आ. औटी, जि. प. चे सदस्य काशिनाथ दाते, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी मंत्रालयात मंत्री मुनगंटीवार यांची भेट घेऊन रस्त्याच्या मंजुरीबाबत चर्चा केली. मुनगंटीवार यांनी माहिती घेतल्यानंतर वनविभागाच्या मुख्य सचिवांना निधी मंजुरीचे आदेश दिले. पिढ्यान् पिढ्यांची मागणी मार्गी लागल्याने गाजदीपूरच्या आदिवासी बांधवांनी जल्लोष केला.