Thu, Apr 25, 2019 12:19होमपेज › Ahamadnagar › गर्भात लिंग बदल करणारा भोंदूबाबा जेरबंद

गर्भात लिंग बदल करणारा भोंदूबाबा जेरबंद

Published On: Aug 12 2018 1:00AM | Last Updated: Aug 11 2018 11:56PMपारनेर : प्रतिनिधी  

मुले होतील, दुखणे बरे होईल, गर्भाचे लिंग बदलले जाईल, अशी बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणार्‍या भोंदुबाबास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 11) पहाटेच्या सुमारास केली.  

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कान्हूरपठार ते पिंपळगाव रोठा या रस्त्यावर बबन सीताराम ठुबे, त्याचा सासरा महादेव संभाजी सोनावळे हे जादूटोणा करून लोकांची फसवणूक करीत असल्याची माहिती पुण्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अश्‍विन जनार्दन भागवत व त्यांचे मित्र आशिष चौधरी यांना समजली. 

गेल्या आठ महिन्यांपासून भागवत व त्यांचे सहकारी ठुबे आणि सोनावळे यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. भानामतीसारखे प्रकार करून राखेतून औषध प्राशन करण्यास सांगून तुम्हाला मुलगा होईल, दुखणे बरे होईल, असे सांगून हे दोघे नागरिकांची फसवणूक करीत होते. बबन ठुबे स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून ज्यांना मुले होत नाहीत, अशा व्यक्‍तींना औषध देत असे. 

गर्भधारणेपासून अडीच महिन्यांपर्यंत लिंग बदलून देतो, असे सांगत आपण पाण्याचा जनक असून, पाण्याचा शोध लावत असल्याचा दावाही तो कररत असे. मुलींशी बोलताना तो अश्‍लिल भाषा वापरत असे. एखाद्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल असे बोलतना व्हिडिओ, ऑडिओ क्‍लिप भागवत व त्यांच्या सहकार्‍यांनी पोलिसांच्या हवाली केल्या होत्या.    

बबन ठुबे याची पत्नी लतादेवी, मुलगा विजय हे औषधे बनविण्यासाठी मदत करत. ठुबे याच्या मुली सुनीता खोडदे व रोहिणी खोडदे या बाबाचा प्रचार व प्रसार करत, तर बबनचा सासरा महादेव सोनावळे हा जादूटोणा तांत्रिक आहे. भानामती, बुवाबाजी करणे हा त्याचा धंदा आहे. त्याची मुले कैलास व अण्णा हे महादेव व्यवहार पहात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अश्‍विन भागवत, मनीषा विवेकानंद म्हात्रे, अलका निरंजन आरळकर यांनी बबन ठुबे व महादेव सोनावळे यांच्या या उद्योगांची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना पुराव्यासह दिल्यानंतर शर्मा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या नेतृत्वाखालील पथक शुक्रवारी (दि.10) रात्री 10 वाजता कान्हूरपठार येथे गेले. ठरल्याप्रमाणे ठुबे हे बाबाच्या घराजवळ गेल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक वाहनात डिझेल टाकून येतो, असे सांगून तेथून दूर गेले. 

बाबाच्या घरात गेल्यानंतर बनावट ग्राहक बनलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्याने आठ हजार रुपये देऊन बाबाकडून मुलगा होण्याचे औषध घेतले. दुसर्‍या बनावट महिला ग्राहकाने पती घरातून निघून गेल्यामुळे उपाय सांगण्याची विनंती केली. एका शर्टवर कोळशाने रेघोट्या मारून, मंत्रमारून तो त्या महिलेकडे देऊन बाबाने त्या बदल्यात 500 रुपये घेतले. दोन्ही ग्राहकांकडून पैसे स्वीकारल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ठुबे बाबाच्या घरात घुसले. त्यास ताब्यात घेऊन घरात असलेले जादूटोण्याचे साहित्य जप्त केले.  

पहाटे दोन वाजता आरोपीस पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बबन ठुबे, महादेव सोनावळे, लता ठुबे, विजय ठुबे, सुनीता खोडदे, रोहिणी खोडदे, कैलास सोनावळे, अण्णा सोनावळे यांच्या विरोधात महाराष्ट्र जादू टोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. देशमाने यांच्यासह काळे, मोहन गाजरे, रवींद्र कर्डिले, सागर सुलाने, योगेश सातपुते, सचिन कोळेकर यांनी ही कारवाई केली.

स्त्रीरोग तज्ज्ञांनाही मुले झाल्याचा दावा

आमच्या औषधांमुळे राज्यातील स्रिरोगतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांनाही मुले झाल्याचा दावा, या भोंदू बाबाने केल्याचे भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा भोंदू बाबा ज्या डॉक्टरांची नावे सांगत आहे, त्या स्त्रिरोगतज्ज्ञांचीही चौकशी करण्याची मागणी भागवत यांनी केली आहे.