Thu, Jun 27, 2019 11:49होमपेज › Ahamadnagar › पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार : निकालानंतर विशेष वकील नियुक्त! 

पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार : निकालानंतर विशेष वकील नियुक्त! 

Published On: Aug 11 2018 1:18AM | Last Updated: Aug 11 2018 1:18AMनगर : प्रतिनिधी

पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात मंत्रालयातील ‘बाबूं’चा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे. या खटल्यात न्यायालयाने 3 ऑगस्ट रोजीच आरोपीला दोषी ठरविले असून, 7 ऑगस्ट रोजी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. असे असताना राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली असून,  त्यांना या नियुक्तीचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला आहे.  

नगर रेल्वे स्थानक परिसरातून अवघ्या पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून बाळू गंगाधर बर्डे (30, रा. सोनगाव पाथरी, ता. राहुरी) या आरोपीने तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता. यात पीडितेस कायमस्वरुपीच्या गंभीर जखमा झालेल्या आहेत. या खटल्याच्या कामकाजास विलंब होत होता. त्यामुळे ‘पुढारी’ने ‘ती चिमुरडी न्यायाच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.
त्यावरून शिवसेना प्रवक्त्या आ. नीलम गोर्‍हे, महापौर सुरेखा कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.

त्यांचे निवेदन प्राप्त होताच जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी तातडीने डिसेंबर 2017 मध्ये अ‍ॅड. यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांमार्फत पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. महासंचालक कार्यालयातून हा प्रस्ताव गृह मंत्रालयात सादर करून, तेथून तो विधी व न्याय विभागात गेला. पोलिस प्रशासनाने तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, मंत्रालयातील ‘बाबूं’ची हा प्रस्ताव धूळखात ठेवला. 1 ऑगस्ट 2018 रोजी या खटल्यात अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केल्याचा आदेश विधी व न्याय विभागाने काढला आहे. तो आदेश अ‍ॅड. यादव यांना गुरुवारी (दि. 9) प्राप्त झाला. त्यापूर्वीच या खटल्याचा निकाल लागलेला आहे. 

अ‍ॅड. यादव यांची चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात राज्य शासनाने नियुक्ती केली. तसा आदेशही काढला. मात्र, गेल्या 8 महिन्यांमध्ये या खटल्याच्या कामकाजात गती आली व आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही झाली. आरोपीला शिक्षा ठोठाविल्यानंतर दोन दिवसांनी विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीचा आदेश संबंधितांना प्राप्त झाला आहे. या प्रकरणातून अवघ्या पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अनैसर्गिक पाशवी अत्याचाराच्या गंभीर घटनेतही मंत्रालयातील ‘बाबूं’चा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे. 

गुरुवारी आदेश प्राप्त झाला

नगर रेल्वे स्थानक परिसरात चिमुरडीवरील अनैसर्गिक अत्याचार प्रकरणात माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला. त्यामुळे मी या खटल्याबाबत चौकशी केली असता, 7 ऑगस्ट रोजीच आरोपीला शिक्षा झाल्याचे मला समजले.  -अ‍ॅड. उमेशचंद्र यादव-पाटील, विशेष सरकारी वकील