Sat, Apr 20, 2019 08:07होमपेज › Ahamadnagar › छिंदम मुद्द्यावरुन संघ-भाजप टार्गेट!

छिंदम मुद्द्यावरुन संघ-भाजप टार्गेट!

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 10:56PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्यामुळे उपमहापौर पद गमावावे लागलेल्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करतांनाच त्याला राज्यातून हद्दपार करण्याची मागणीही कालच्या (दि.26) सभेत सदस्यांकडून करण्यात आली.  छिंदमच्या मुद्द्यावरुन सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला टार्गेट करण्यात आल्याने, भाजप नगरसेवक चांगलेच संतप्त झाले होते.

सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे शर्ट, साड्या परिधान करुन व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेवून घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला. मनसेच्या वतीनेही सभापती सुवर्णा जाधव यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवकांनी छत्रपतींना अभिवादन करुन सभेत हजेरी लावली. सभेच्या सुरुवातीलाच भाजपाचे गटनेते दत्तात्रय कावरे यांनी सभागृहात निवेदन वाचून श्रीपाद छिंदमचा निषेध केला. त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव मांडत, एखाद्या कार्यक्रमात त्याने संघाचा गणवेश घातला म्हणजे तो संघाचा स्वयंसेवक होत नाही, असा खुलासा केला. त्यानंतर नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी छिंदमचा व भाजपाचा कुठलाही संबंध राहिलेला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, बहुतांशी सदस्यांनी छिंदम मुद्द्यावर भाजपलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

नगरसेवक कैलास गिरवले यांनी छिंदमला कृष्णाजी भास्कर यांची उपमा देत, असेच लोकं व विकृती आजही समाजात आहेत, संघाचे लोकंच असे करु शकतात, अशा शब्दांत भाजप व संघाला टार्गेट केले. यावेळी नगरसेवक वाकळे, गांधी यांनी त्यांना विरोध करत संघटनेवर बोलू नका, विषयावर बोला, अशा शब्दांत सुनावले. मात्र, अद्यापही तो भाजपचाच नगसेवक असल्याने भाजपवर का बोलायचे नाही? असा सवाल करुन ‘जसं झाड वाढवलं, तशीच फळं येणार, आरएसएसनेच या विकृती जन्माला घातल्या’, अशा शब्दांत हल्ला चढविला. भाजप नगरसेवक आक्रमक झाल्यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. महापौरांसह इतर नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यानंतर या वादावर पडदा पडला.

गिरवले यांच्यासह इतर नगरसेवकांनीही छिंदमचा निषेध करतांना भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. सभेच्या अजेंड्यावर श्रीपाद छिंदमच्या नावापुढे भाजपचा उपमहापौर, नगरसेवक तसेच ‘श्री’ लावण्यात आल्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, ज्या पत्रांच्या आधारावर ही सभा काढण्यात आली, त्याच पत्रात असे उल्लेख असल्याने तसे शब्द अजेंड्यात घेण्यात आल्याचा खुलासा नगरसचिव एस. बी. तडवी यांनी केला. त्यानंतर नगरसेवकांनी नरमाईची भूमिका घेत सदरचे शब्द हटविण्याची मागणी केली.