Tue, Mar 19, 2019 16:07होमपेज › Ahamadnagar › जिल्हाधिकार्‍यांकडून झाडाझडती 

जिल्हाधिकार्‍यांकडून झाडाझडती 

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 10:44PMनगर : प्रतिनिधी

महापालिका मुख्यालयातील 59 लेटलतिफ कर्मचार्‍यांची बिनपगारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. द्विवेदी यांनी काल (दि.15) मनपात येवून हजेरी पुस्तकाची तपासणी केली. यात 238 पैकी तब्बल 59 कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे लेटलतिफ कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ उडाली.

आयुक्‍तांचा प्रभारी कार्यभार असलेल्या द्विवेदी यांनी सध्या मनपाच्या कारभारावर लक्ष केंद्रीत केले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर काल सकाळी पुन्हा त्यांनी मनपात हजेरी लावली. यावेळी प्रभारी उपायुक्‍तांचा कार्यभार असलेले अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच विभागांतील हजेरी पुस्तकांची तपासणी करुन झाडाझडती घेतली. यात तब्बल 59 कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. या सर्वांची ‘बिनपगारी’ करण्याचे आदेश द्विवेदी यांनी दिले. तपासणी सुरु असतांनाच प्रभारी उपायुक्‍त हजर झाल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मात्र टळली.

दरम्यान, अनुपस्थित कर्मचार्‍यांमध्ये घनकचरा विभागातील 9, नगरसचिव कार्यालयातील 9, प्रसिध्दी विभागातील 3, अतिक्रमण विभागातील 2, पाणीपुरवठा 1, नगररचना 6, महापौर कार्यालय 7, बांधकाम विभाग 10, विद्युत विभाग 2, लेखा विभाग 3, सामान्य प्रशासन 6 व आस्थापना विभागातील 1 असे 59 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटीसा बजावून खुलासा मागविण्यात येणार असल्याचे आस्थापना विभागाकडून सांगण्यात आले.