Tue, Jul 16, 2019 02:10होमपेज › Ahamadnagar › चौंडी गोंधळ प्रकरण; उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार

चौंडी गोंधळ प्रकरण; उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 16 2018 12:04AMजामखेड : प्रतिनिधी

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत धनगर समाजाला आरक्षणाची मागणी करणार्‍यावर गुन्हे दाखल करुन तुरुंगात डांबले आहे. तुरूंगात त्यांचे हाल होत आहेत. या घटनेची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असून या कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना जामखेडला पाठविले होते. हे गुन्हे मागे घेण्यासाठी ठाकरे दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले.

धनगर समाजाबरोबर इतर समाजामध्ये भाजपा सरकारविषयी चीड निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमिवर शिवसेनेनेही भाजपाविरोधात ही संधी साधली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी तुरूंगातील आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. दरम्यान  तुरूंगातील आंदोलकांचे म्हणणे वरिष्ठांना सांगून सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे राठोड म्हणाले.

यावेळी उपमहापौर अनिल बोरूडे, मोहन जाधव, सचिन हाळनोर, अंकुश उगले, विकास मासाळ, संजय खरात, संतोष वाळूंजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडे आंदोलकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. 31 मे रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या 51 समाजबांधवांवर भारती दंड विधानाच्या कलम 307, 353 व अन्य गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 35 जणांना जामीन मंजूर झाला आहे. 16 जण अटकेत आहेत. यातील अनेकांवर दोषी नसताना गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यात अनेक शालेय विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, वकिल, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. पोलिसांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत. 

डॉ. इंद्रकुमार भिसे व अप्पासाहेब मासाळ यांनी राठोड यांच्याशी बोलताना सांगितले की, धनगर समाजातील तरुणांबरोबर मराठा समाजातील तरुण कार्यकर्ते आहेत. अनेक विद्यार्थी आहेत. दर्शनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांवर धरपकड करून गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व कट कारस्थान पालकमंत्री राम शिंदे यांचे आहे. पालकमंत्री शिंदे यांनी प्रशासनावर दबाव आणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अहिल्यादेवी होळकर जयंतीसाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन येणार म्हटल्यावर कडक सुरक्षा व्यवस्था हवी होती. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे हवे होते. श्‍वान पथकासह सर्व यंत्रणा सज्ज हवी होती. परंतु कसलीही यंत्रणा नव्हती. कार्यक्रमाचे आयोजक पालकमंत्री शिंदे होते. कार्यक्रमात गोंधळ झाला म्हणून जयंती आयोजकावर म्हणजे पालकमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. 

जयंती कार्यक्रमात गोंधळ होणार हे माहित होते. तीन जणांना जिल्हाबंदीची नोटीस होती. तरीही एवढे लोक जयंती कार्यक्रमात आले कसे. कार्यक्रमात गोंधळ व्हावा, ही पालकमंत्री शिंदे यांचीच इच्छा होती. त्यामुळे जिल्हाबंदीची नोटीस असतानाही बंदी असलेले कार्यकर्ते आले. या ठिकाणी नेमके दगड आले कसे, मुद्दामच पालकमंत्री शिंदे यांनी हे कटकारस्थान करून आम्ही तीन वर्षापासून धनगर आरक्षणाची मागणी करतो म्हणून आम्हाला अडकविले आहे. आमच्या वरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत व जयंती आयोजक म्हणून पालकमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. आंदोलकांनी सांगितले की आम्ही तुरूंगातून सुटल्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घालून द्या. आमच्या भावना आम्हाला त्यांच्या कानावर घालायच्या आहेत.