Mon, May 20, 2019 08:54होमपेज › Ahamadnagar › चार एकर ऊस जळाला

चार एकर ऊस जळाला

Published On: Dec 21 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 11:03PM

बुकमार्क करा

चांदा : वार्ताहर

नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळाला. तसेच तीन लाखाचे ठिबक सिंचन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.या बाबत सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील रस्तापूर शिवारात गट नं. 444 मध्ये दगडू यादव पवार यांची शेती आहे. त्यामध्ये ऊस व ठिबक तसेच गट नं 446 मध्ये किरण सुभाष भाकड व नारायण सुभाष भाकड यांचा ऊस व ठिबक सिंचन असे दोन्ही गटांमधील 4 एकर ऊस व ठिबक सिंचन रोहित्रातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागून भस्मसात झाले. आग लागल्याचे पवार यांना शेजारच्या शेतातील शेतकर्‍याने दूरध्वनी वरून माहिती दिली. पवार यांनी भाकड यांना देखील दूरध्वनीकरुन उसाला आग लागल्याची माहिती दिली. दोन्ही शेतकरी घटनास्थळी धावत आले. तेव्हा आगीचे लोळ आकाशकडे झेप घेत होते. प्रचंड प्रमाणात वारे वाहत असल्याने अग्नीतांडव काही केल्या थांबेना. 

या आगीची बातमी वार्‍यासारखी पसरली. गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अरुण सावंत यांनी मुळा कारखाना अग्निशमन दलाला आग लागल्याचे कळवले. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत पूर्ण ऊस व ठिबक सिंचन जळून खाक झाले होते. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वीज बंद झाली होती. इलेक्ट्रिक मोटारी बंद असल्याने विहिरी, बोअरचे पाणी असूनही आग विझविण्यासाठी वापरता आले नाही. 

या दोन्ही शेतकर्‍यांना शासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी, त्यांचे ठिबकचे तीन लाख रुपये नुकसान झाले आहे. तसेच जाळीत झालेल्या उसासाठी कारखान्यांनी जास्तीत जास्त मदत द्यावी, त्यामुळे शेतकर्‍यांना आधार मिळेल, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली ेआहे. वसंतराव उकिरडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पंचनामा रस्तापूर येथील तलाठी बी. डी.कराळे व बाळासाहेब पवार यांनी केला. यावेळी अरुण सावंत घटनास्थळी होते. या जळीतामुळे रस्तापूरातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली.