Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Ahamadnagar › काँगे्रस, शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला!

काँगे्रस, शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : मुरलीधर तांबडे

केडगावातील प्रभाग क्रमांक 32 च्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. घरोघरी जाऊन प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला जात आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना, दुसरीकडे काँग्रेस-शिवसेना-भाजपाकडून राजकीय वातावरण तापविले जात आहे. आरोप-प्रत्यारोपांसह केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारराजापुढे मांडला जात आहे. महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा ‘ट्रेलर’ म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहिले जात आहे. काँग्रेस व शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत संपूर्ण ताकद लावली आहे. त्यात भाजपनेही उमेदवार उभा केल्याने आणखी रंगत आलेली आहे.

माजी महापौर संदीप कोतकर याचे नगरसेवकपद रद्द झाल्यानेे प्रभाग 32 मध्ये येत्या 6 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. काँगे्रसकडून विशाल कोतकर, शिवसेनेचे विजय पठारे व भाजपचे महेश सोले यांच्यात तिरंगी लढत होत आहे. पूर्वीपासून या प्रभागात प्राबल्य असल्याने काँग्रेस पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत आपली ताकद पणाला लावली आहे. केडगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आठपैकी सहा नगरसेवक काँग्रेसचे आहेत. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जागा कायम आपल्याकडे ताब्यात ठेवण्यासाठी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी चंग बांधला असून, स्वत: प्रचाराची सूत्रे हाती घेत त्यांनी कार्यकर्ते कामाला लावले आहेेत. आतापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा त्या जनतेसमोर मांडत आहेत. 

शिवसेना-भाजप युतीत ही जागा लढविण्यावरून घटस्फोट झाल्याने यंदा केडगावात दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत. यामुळे मतांची फाटाफूट होऊन याचा लाभ कोणाला मिळणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक दिलीप सातपुते यांच्यासाठी ही निवडणूक तितकीच प्रतिष्ठेची ठरणार आहे. शहरप्रमुख झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली केडगावात होत असलेल्या या पोटनिवडणुकीत सेनेचा उमेदवार विजयी होण्यासाठी त्यांनीही ताकद लावली आहे. एकाचवेळी त्यांना काँग्रेससह मित्रपक्ष असलेल्या भाजपबरोबर सामना करावा लागत आहे. शिवसेनेकडून काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करतानाच विकासाचा मुद्दाही मांडला जात आहे.

केडगावात आजपर्यंत झालेल्या नगरपालिका, महापलिकेच्या निवडणुकीत सेना-भाजपने एकत्रितपणे निवडणुका लढविल्या. यंदा मात्र दोन्ही पक्ष आमनेसामने आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर लढून महापलिका ताब्यात घेण्याचे सूतोवाच भाजपाच्या नेत्यांकडून केले जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी ही पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपातील अंतर्गत गटबाजीचा फटका या पक्षाला बसण्याची शक्यता आहे. केडगाव भाजप मंडल अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद शमलेला नाही. त्यामुळे निवडणुकीत आगरकर गट अलिप्त असल्याचे दिसत आहे. खा.दिलीप गांधी गटाचे असलेले मंडल अध्यक्ष शरद ठुबे यांनी पक्षाचा उमेदवार विजयी होण्यासाठी ताकद लावली आहे. एकंदरीत अवघ्या आठ महिन्यांवर आलेली सार्वत्रिक निवडणूक पाहता, ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याने, सर्वांनीच राजकीय ताकद पणाला लावली आहे. 


  •