होमपेज › Ahamadnagar › भावाच्या अपघाताचा बनाव; बहिणीस लुटले

भावाच्या अपघाताचा बनाव; बहिणीस लुटले

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 27 2018 12:02AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीला पोलिस खात्यातील भावाच्या अपघाताची खोटी माहिती देत, लुटल्याची घटना शनिवारी (दि.25) दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी फसवणूक, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सीमा अनिल बंडगर (रा. भिगवण, ता. इंदापूर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे माहेर काष्टी येथील खरातवाडी हे आहे. रक्षाबंधनासाठी त्या शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास काष्टीत उतरल्या. खरातवाडीला  जाण्यासाठी अजनूज चौकात थांबल्या असता, एकाने घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्या पोलिस खात्यातील भावाचा अपघात झाला, तुम्ही लगेच चला, असे सांगितले. त्याने बंडगर यांना घाईने दुचाकीवर बसवून दौंडच्या दिशेने नेले. सांगवीफाटा येथे गेल्यानंतर बंडगर यांना संशय आला. त्यांनी गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र, पुढे साहेबांची गाडी असल्याचे सांगत त्याने नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणार्‍या खडी-क्रेशरच्या ढिगार्‍यापर्यंत दुचाकी नेली. अचानक दुचाकीने रस्ता बदलल्याने बंडगर घाबरल्या. मात्र, काही समजण्यापूर्वीच लुटारूने ढिगार्‍याच्या आडोशाचा फायदा घेत बंडगर यांना लाकडाने मारहाण करुन त्यांच्या अंगावरील व बॅगेतील एक लाख दहा हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन पोबारा केला.