Fri, Jul 19, 2019 22:34होमपेज › Ahamadnagar › पार्सल पडले आणि बॉम्ब अहमदनगरमध्येच फुटला

पार्सल पडले आणि बॉम्ब अहमदनगरमध्येच फुटला

Published On: Mar 22 2018 1:38AM | Last Updated: Mar 22 2018 1:30PMनगर : प्रतिनिधी

‘मै आपकी बहुत रहेनुमा गुजार हूँ. आपके लिये तोहफा भेज रही हूँ...’ अशा स्वरुपाचा मजकूर असलेली चिठ्ठी एका तरुणीच्या नावे लिहून संजय नहार यांना भेट म्हणून बॉम्ब पाठविला होता. परंतु, नहार याचे दैव बलत्तर होते. पार्सल खाली पडल्याने आवाज झाला. त्यामुळे पॅकिंगमधील वस्तू पाहण्याचा मोह कुरियरवाल्याला आवरला नाही अन् हा बॉम्ब नगरमध्येच फुटला. त्यामुळे हा बॉम्ब पुण्यात नहार यांच्यापर्यंत पोहोचूच शकला नाही व बॉम्ब पाठविणार्‍यांचे मनसुबे धुळीस मिळाले. 

काश्मिर खोर्‍यात शांततेचे प्रयत्न करणार्‍या व तेथील मुलांना शिक्षण देण्यासाठी पुण्यातील कात्रजमध्ये शैक्षणिक संस्था चालविणारे ‘सरहद्द’ संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या घातपाताच्या उद्देशाने रेडिओ संचात मानवनिर्मित बॉम्ब बसविण्यात आला होता. त्या रेडिओची पीन विद्युत बोर्डला लावताच स्फोट होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. मंगळवारी (दि. 20) दुपारच्या सुमारास मारुती कुरियर दुकानात असलेल्या आश्‍विनी पटेकर यांच्याकडे एफएम रेडिओचे पार्सल घेऊन एक जण आला. स्टार नक्षीकाम असलेल्या जांभळ्या रंगाच्या जिलेटीन पेपरमध्ये हे पार्सल पॅकिंग केलेले होते. ते पुण्यातील सरहद्द संघटनेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या पत्त्यावर पाठवायचे होते. त्या पार्सलबाबत पटेकर यांनी कुरियर बॉय संजय क्षीरसागर यांना फोन केला. एफ.एम. रेडिओचे पार्सल पुण्याला जाईल का, असे विचारले. त्यांना हो म्हटल्यावर पटेकर यांनी संबंधित व्यक्तीकडून ते पार्सल स्विकारले. 

रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास क्षीरसागर यांनी पार्सलवर नाव टाकण्याचे काम सुरू केले. त्यावेळी एक पार्सल खाली पडले. खाली पडताच त्या पार्सलमधून ‘टीव’ असा आवाज आला. जांभळ्या रंगाच्या जिलेटीन पेपरमधील त्या पार्सलचा संशय आल्याने क्षीरसागर यांनी ते पार्सल फोडले. त्यात एफ.एम. रेडिओसारखी वस्तू होती व सोबत एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिले होते की, ‘संजय सर, मै नगमा शेख मेरा सलाम कबुल किजिये. मै आपके सरहद्द कालेज मे पढी हूँ. आज आपके वजहसे अपने पैरोपें खडी हूँ. अच्छी नोकरी करती हूँ. पहले पूना मे रहती थी. अब अहमदनगर मे हूँ. आपने मुझे कालेज के वक्त पैसो की रहनेका इन्तजाम किया था. मै आपकी बहुत रहेनुमा गुजार हूँ. आपके लिये मैंने एक तोहफा भेजा है. मैने मेरी आवाज रेकॉर्डिंग कि है. आप जरुर सुनिय सर, मुझे अच्छा लगेगा. अल्ला से दुआ करती हूँ, आपकी हर ख्वाइश पुरी हो. संजय सर, खुदा हाफीस.’ 

ही चिठ्ठी वाचल्यानंतर क्षीरसागर यांनी एफएम रेडिओसारखी वस्तू हातात घेतली. त्याच्या पाठीमागे ‘इसमें बॅटरी नही है, इसको चार्जिंग लगा के सुनो,’ असे लिहिले होते. त्यामुळे क्षीरसागर यांनी सदर वस्तूमधील चार्जिंगची पिन कुरियर कार्यालयातील इलेक्ट्रिक बोर्डामध्ये घातली. पिन घालताच मोठा आवाज स्फोट झाला. पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटाने क्षीरसागर यांचा हात, छाती, डावा पाय व कपाळावर जखमा झाल्या. त्यावेळी कुरियर कार्यालयातील कर्मचारी संदीप भुजबळ यांनाही स्फोटामुळे जखमा झाल्या. या स्फोटामुळे कुरिअरच्या कार्यालयातील फर्निचर, इतर वस्तू व कागदपत्रांचे नुकसान झाले. जखमी अवस्थेतील क्षीरसागर व भुजबळ हे कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर दोघांनाही परिसरातील रहिवाशांनी उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पिटल येथे दाखल केले. यातील संदीप भुजबळ यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. संजय क्षीरसागर यांच्यावर औषधोपचार चालू आहेत. 

एफएम रेडिओ संचात बसविलेल्या बॉम्बच्या माध्यमातून संजय नहार यांच्या घातपाताचा प्रयत्न होता. परंतु, त्यांचे दैव बलत्तर होते. त्यामुळे हा रेडिओ बॉम्ब पुण्यात संजय नहार यांच्या हातात फुटण्याऐवजी नगरमधील कुरियर दुकानात फुटला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्नासह भारतीय स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अभय परमार हे करीत आहेत.