Wed, Apr 24, 2019 15:43होमपेज › Ahamadnagar › आमराईतून जनतेचे प्रश्‍न सुटत नाही

आमराईतून जनतेचे प्रश्‍न सुटत नाही

Published On: Jan 06 2018 1:17AM | Last Updated: Jan 05 2018 11:17PM

बुकमार्क करा
बेलपिंपळगाव : वार्ताहर

जिल्ह्यात ऊस भाव वाढून मिळत असताना आपल्याकडील शेतकर्‍यांची मात्र हे दिशाभूल करत असल्याचा आरोप करून आमराईत बसून जनतेचे प्रश्‍न सुटत नाहीत, त्या करीता जनतेत यावे लागते, असा उपरोधिक टोला आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाखांचे नाव न घेता लगावला.  

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे काल सकाळी 9 वा. आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते गावात नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशन, हनुमान मंदिर भक्त निवास, मुस्लिम कब्रस्तान संरक्षक भिंत, बेलपिंपळगाव जैनपूर रस्ता मजबुतीकरण करणे अशा विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक गंगाधर वैद्य हे तर व्यासपीठावर माजी सभापती दिगंबर शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष माऊली पेचे, महावितरणचे बोरसे, चव्हाण, पाटील, बापूसाहेब औटी, दीपक चौगुले, संभाजी शिंदे, सुखदेव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. मुरकुटे म्हणाले, तालुक्यात विकास कामांचे पर्व सुरू असून राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बेलपिंपळगाव येथील जनतेचे मोठे प्रेम असून सगळ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी व गावाचा विकास करण्यासाठी मी सदैव बांधील आहे. जैनपूरसाठी नवीन रोडला 86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हे काम सुरू केले जाईल, घोगरगाव व जैनपूरसाठी शेती पंपाला स्वतंत्र सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. बेलपिंपळगावला राष्ट्रीय बँक, फाट्यावर बसस्टॅण्ड उभारण्यात येणार आहे.  या गटात मी जर 4 कामे केले तर  विरोधकांनी  किमान 1 तरी काम करावे, जनतेत येऊन त्यांचा सत्कार करू, असेही आव्हान त्यांनी यावेळी केले.

यावेळी आ. मुरकुटे यांचा ग्रामपंचायत, हनुमान देवस्थान, मुस्लिम समाज व ग्रामस्थ यांनी सत्कार केला. बेलपिंपळगाव येथे कार्यरत असलेले वायरमन अजीज पटेल व त्यांचे सहकारी महेश खराडे हे योग्य प्रकारे काळजी घेऊन काम करतात व शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येतात  म्हणून त्यांचा ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला

 कार्यक्रमास विश्‍वंभर शिंदे, प्रा. रमेश सरोदे, प्रा कार्लस साठे, बबनराव वरघुडे, दिगंबर धिरडे, कल्याण शिंदे, विजय शेरकर, मुमताज सय्यद, राजेंद्र सुरसे, अरुण देशमुख, डॉ. सचिन सांगळे, सचिन नागपुरे, किशोर बोखारे, दत्तात्रय राऊत आदी उपस्थित होते. कृषीमित्र एकनाथ भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले.