Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Ahamadnagar › तोतया ट्रॉफिक पोलिसाने व्यापार्‍यास लुटले 

तोतया ट्रॉफिक पोलिसाने व्यापार्‍यास लुटले 

Published On: Dec 13 2017 1:52AM | Last Updated: Dec 12 2017 10:51PM

बुकमार्क करा

नेवासा : प्रतिनिधी 

वाहतूक पोलिस असल्याचे  भासवून कापसाच्या व्यापार्‍यास गाडीसह चार लाखां लुटल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. यामध्ये गाडी 9 लाख व 4 लाख रोकड असा तेरा लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार नेवासा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नेवासा फाटा परिसरात रविवारी हा प्रकार झाला. 
वळण (ता. राहुरी) येथील कापूस व्यापारी युनूस शेख यांनी सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नेवाशाकडे येण्यासाठी निघालो असता नेवासा फाट्यावर रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास  रस्त्याच्या कडेला खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट व जर्कीन तसेच डोक्यात हेल्मेट घालून मोटारसायकलवर बसलेल्या एका इसमाने गाडीला हात करून बाजूला लावण्याचा इशारा करून थांबण्यास सांगितले. त्यांच्या अंगातील कपड्यांवरून वाहतूक पोलिस असल्याचे वाटल्याने गाडीचा वेग कमी केला. मात्र त्याच्या जवळ जात असताना हा पोलिस नसावा असा अंदाज आल्याने गाडीचा वेग पुन्हा वाढविला. त्यानंतर या इसमाने मोटारसायकलवरुन (एमएच 19 एएस 1553) पाठलाग करून गाडी बाजूला लावायला सांगितले.

गाडी चालवताना फोनवर बोलतो असे म्हणत गाडीच्या मागे दुचाकी लावून मला बोलवत वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्रांची मागणी केली. मी कागदपत्र असल्याचे सांगितले. परंतु वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे सांगताच गाडी पोलिस ठाण्यात न्यावी लागेल, असे सांगत हेल्मेट काढून खिशातील पोलिस टोपी माझ्या गाडीत टाकून स्वतः गाडी चालविण्यास सुरुवात केली. तू पलीकडून येऊन गाडीत बस, असे सांगितले. मी गाडीत बसण्यास गेलो असता, तो गाडी (एमएच. 17 बीव्ही 1352) घेऊन भरधाव वेगाने नेवाशाच्या दिशेने निघून गेला. गाडीची किंमत 9 लाख तसेच 4 लाख रुपये रोख व चेकबुक, कागदपत्रे अशी एकूण 13 लाख रुपयांची लूट झाली असल्याचे कापूस व्यापारी युनूस शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नेवासा पोलिसांनी भा.द.वि. कलम 171,419,420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे करीत आहेत. चोरट्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या बनावट वाहतूक पोलिसांबरोबर आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. रस्ता लूट करणारी टोळीच असावी. ही घटना पाळत ठेवूनच झाली असण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.