Tue, Mar 19, 2019 03:18होमपेज › Ahamadnagar › बसस्थानकाजवळ आढळला मृतदेह

बसस्थानकाजवळ आढळला मृतदेह

Published On: Feb 26 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 11:25PMनेवासा : प्रतिनिधी 

तालुक्यातील वरखेड येथील दिगंबर मारुती गोरे (वय 51) यांचा मृतदेह काल (दि.25) सकाळी आढळून आला. मयताच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने घातपाताच्या शक्यतेमुळे नेवासा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांनी  तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधांतून हा खून झाल्याची चर्चा वरखेड परिसरात होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील वरखेड बसस्थानकानजीक प्रवरासंगम रस्त्यालगत असलेल्या  एका टपरीजवळ दिगंबर मारुती गोरे यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह काल सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यांच्या अंगावर जखमा होत्या. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात आणला होता. मात्र डॉक्टरांनी शंका उपस्थित केल्याने मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मयताचा भाऊ राजेंद्र गोरे यांनी खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस कर्मचारी कैलास साळवे करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.