Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Ahamadnagar › वळणमध्ये तरुणाचा खून; सहाजण ताब्यात

वळणमध्ये तरुणाचा खून; सहाजण ताब्यात

Published On: Aug 21 2018 1:30AM | Last Updated: Aug 20 2018 10:57PMराहुरी : प्रतिनिधी

देवळाली प्रवरा येथील एका मजुराच्या खुनाची घटना घडत नाही तोच वळण भागात 22 वर्षीय मंगेश आण्णासाहेब खिलारी या तरुणाचा मारहाण झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी 8 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून 6 जणांना ताब्यात घेतले आहे. वळण भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात असून गावात तणावाची परिस्थिती आहे. 

मयत मंगेश खिलारी हा मांजरी रस्ता रोड, वळण येथे आई, वडील, चुलते, लहान भाऊ, आजी, आजोबा, चुलत भाऊ व दोन चुलत बहिणींसमवेत राहत होता. दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8.30 वाजता घरातून कीर्तनाला जातो असे सांगून बाहेर पडला होता. घरी न परतल्याने खिलारी कुटुंबीयांनी मंगेशचा सर्वत्र शोध घेतला. सोशल मीडियामध्येही मंगेशच्या माहितीबाबत आवाहन करण्यात आले. दि. 19 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी 10 च्या दरम्यान, मंगेशचे मृतदेह एका बंद पडलेल्या दूध शीतकरण केंद्रात आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने सदरची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी आपल्या पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी नेत मृतदेहाचा पंचनामा केला. घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनीही घटनास्थळी दाखल होत चौकशी हाती घेतली. उपअधीक्षक वाघचौरे व पो.नि. शिळीमकर यांनी तपासाची चक्रे फिरवत मयत मंगेश खिलारी बाबत ग्रामस्थांकडून माहिती घेतली. मंगेशच्या डोक्यात काही, तरी टणक वस्तू व अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश रघुनाथ खिलारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी किरण पोपट कुलट, दादासाहेब शंकर कुलट, प्रशांत नारायण शिकरे, सचिन नंदू जाधव, किरण उत्तम बर्डे, किशोर बाळासाहेब खुळे, लखन बाळासाहेब खुळे, अमोल बाळासाहेब कुलट यांनी 15 दिवसांपूर्वी क्रिक्रेट खेळण्यावरून वाद झाल्याच्या कारणावरून खून केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल केला. आरोपींनी मिरची पूडचा वापर करीत मयताच्या डोक्यात वार केला, तसेच गळ्यावर वार करून मंगेश खिलारी याचा खून आरोपींनी संगनमताने केला. तसेच खुनाचा तपास लागू नये, मयत खिलारी याचा मृतदेह बंद पडलेल्या दूध शीतकरण केंद्रात टाकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.   पोलिसांनी गुन्हा दाखल होताच 6 जणांना ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित आरोपी दादासाहेब शंकर कुलट, किरण उत्तम बर्डे हे दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.