Sun, Oct 20, 2019 01:06होमपेज › Ahamadnagar › ब्लड बँकेची डिमांड घटली!

ब्लड बँकेची डिमांड घटली!

Published On: Jan 11 2018 1:04AM | Last Updated: Jan 10 2018 10:56PM

बुकमार्क करा
नगर : मयूर मेहता

सर्वसामान्यांना माफक दरात रक्‍त पुरवठा करणार्‍या महापालिकेच्या ब्लड बँकेतील रक्‍त विघटक प्रयोगशाळा अन्न व औषध प्रशासन विभागाचा (एफडीए)परवाना नसल्यामुळे अद्यापही कार्यरत झालेली नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतील मशिनरीही सुमारे वर्षभरापासून बंद अवस्थेतच आहेत. वैद्यकीय व्यवसायातील उपचार पध्दतीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे साध्या रक्‍त पिशव्यांऐवजी कम्पोनंटस्ची मागणी वाढत आहे. त्याचा परिणामही मनपाच्या ब्लड बँकेवर झाला असून साध्या रक्‍त पिशव्यांची ‘डिमांड’ही कमी झाली आहे.

वैद्यकीय व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने उपचार पध्दतींमध्येही बदल होत आहेत. त्यामुळे रक्‍तातील लाल पेशी, पांढर्‍या पेशी, प्लेटलेटस् कमी झाल्यास साध्या रक्‍त पिशवी ऐवजी आवश्यक असलेल्या ‘कम्पोनंटस्’चीच मागणी रुग्णालयांमधून केली जाते. अलिकडच्या काळात साध्या रक्‍ताच्या पिशवीचा वापर केवळ अपघात ग्रस्त रुग्णांसाठीच केला जातो. मात्र, मनपाब्लड बँकेत केवळ साध्या रक्‍त पिशव्याच उपलब्ध आहे. त्याची मागणी कमी होत असल्याने आणि ‘ब्लड कम्पोनंटस्’ची मागणी वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम मनपाच्या ब्लड बँकेवर होऊन रक्‍त पिशव्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

ब्लड कम्पोनंटस्ची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेतील रक्‍त विघटक प्रशोगशाळा कार्यरत होण्यास अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. दोन वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळातून ब्लड बँकेत रक्‍त विघटन प्रयोगशाळा उभारणीसाठी व मशिनरी खरेदीसाठी मनपाला निधी मंजूर झालेला आहे. त्यातून 92 लाख रुपयांच्या मशिनरींची खरेदीही करण्यात आली आहे. मात्र, या मशिनरींच्या वापरासाठी ‘एफडीए’चा परवाना आवश्यक आहे. मार्च 2017 मध्ये मनपाने परवान्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. ऑगस्ट महिन्यात तपासणीमधील त्रुटीही दूर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ‘एफडीए’कडून सप्टेंबर महिन्यात पुन्हा तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीनंतर चार महिने लोटले तरी अद्याप महापालिकेला परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे रक्‍त विघटन प्रयोगशाळाही अद्याप कार्यरत होऊ शकलेली नाही. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना खासगी ब्लड बँकांचे उंबरठे झिजवावे लागत असून जादा दराने ब्लड कम्पोनंटस् खरेदी करावे लागत आहेत.

दरम्यान, परवान्यासाठी मनपाकडून अन्न व औषध प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मनपाकडे मशिनरीसह आवश्यक असलेला कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. मात्र, परवाना मिळत नसल्याने प्रयोगशाळा अद्यापही कार्यरत झालेली नाही. मशिनरींचा वापर नसल्याने त्या खराब होऊ नयेत, याची दक्षता घेतली जात असल्याचे मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.