Tue, Jul 23, 2019 04:02होमपेज › Ahamadnagar › प्रायश्‍चित्त..कुरघोडी..अन् सत्तालोलुपता 

प्रायश्‍चित्त..कुरघोडी..अन् सत्तालोलुपता 

Published On: Mar 04 2018 11:45PM | Last Updated: Mar 04 2018 11:44PM 

‘प्रे मात अन् युद्धातच सर्व काही क्षम्य असतंं’, असं म्हणतात..पण, राजकारण बी याला अपवाद नाही बरं का. राज्यातल्या भाजपा-शिवसेना युती सरकारसारखंच महापालिकेतल्या सत्ताधारी युतीतील राजकीय कुरघोड्यांवरून त्याचा प्रत्यय अगदी महापौर-उपमहापौर निवडणुकीपासून येतोय. विधानसभा निवडणुकीत राज्यात युती तुटली..भाजप अन् सेना स्वतंत्र लढले..पण स्वबळावर दोघांनाही सत्ता मिळाली नाही. मग काय ‘तुझं माझं जमेना, अन् तुझ्यावाचून करमेना’,असंच ठरलेलं राजकारण. सत्तेसाठी एकत्र आले खरे, पण गेल्या साडेतीन-चार वर्षांत दोन्ही पक्षाचं फारसं काही जमलं नाही. सत्तेत राहून विरोधकाची भूमिका बजावण्याची संधी सेनेनं काही सोडली नाही. वारंवार सत्तेतून बाहेर पडण्याचे इशारे नुसतेच फुसके ठरले.

विरोधकांनी सेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर टीका केली खरी. पण पोटनिवडणुका नकोत, असं डबलगेम राजकीय ‘कारण’ सांगत सेना सत्तेला चिटकूनच राहिली. आता म्हणे आगामी निवडणुकांत भाजपाशी युती करायची नाही, अशी घोषणा सेनेनं करून टाकलीय. पण मागच्या निवडणुकीत तरी कुठं युती होती, याचं काय? नगरच्या महापालिकेतंही सेना-भाजपचं असंच राजकारण. मुळात महापौर-उपमहापौर निवडणुकीपासून या दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडलेली. शेवटच्या क्षणी ते सत्तेसाठी एकत्र आले, पण मनाने मात्र दूरच राहिले. गेल्या दोन वर्षांत दोन्ही पक्षांचं महापालिकेत फारसं असं पटलंच नाही.  भाजप, काँगे्रस-राष्ट्रवादीचा बंडखोर गट अन् काही अपक्षांच्या कडबोळ्यांसह सत्तेवर स्वार झालेल्या सेनेला गेल्या दोन वर्षांत शहराच्या विकासासाठी फारसं काही करणंच जमलं नाही.

‘गरज सरो वैद्य मरो’ या उक्‍तीप्रमाणे सत्तेसाठी मदत केलेल्यांना न जुमानण्याच्या प्रवृत्तीमुळे मिस्टर महापौरांनी पक्षांतर्गतच विरोधक निर्माण केले. त्याचाच परिपाक उपमहापौर निवडणुकीच्या निमित्तानं पहायला मिळालाय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यानं भाजपच्या श्रीपाद छिंदमला उपमहापौरपद सोडावं लागलं. भाजपविरोधात रान उठविण्यासाठी शिवसेनेला हे आयतचं कोलीत मिळालं आणि मग मिळालेल्या संधीचा त्यांच्याकडून पुरता लाभ उठविण्यात आला. छिंदमनं केलेलं कृत्य हे अक्षम्यच आहे. त्याला उपमहापौरपदावर बसविणार्‍या भाजपातील खासदार दिलीप गांधी गटाला त्यामुळं बॅकफूटवर जावं लागलं.

छिंदमविरोधात मोर्चे, आंदोलने करताना, मग काय शिवसेनेनं खा. गांधी यांनाही ‘टार्गेट’ करण्याची संधी सोडली नाही. छिंदमच्या वक्‍तव्यावरून जनतेत उफाळून आलेला असंतोष लक्षात घेऊन भाजपनं त्याची लगेच पक्षातून हकालपट्टी केली. शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या खा. गांधी यांच्या नावानं त्याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामाही घेण्यात आला. तिच प्रत महापौर आणि आयुक्‍तांना दिल्यानंतर तांत्रिक मुद्यांचा विचार न करता, महापौरांनी छिंदमचा राजीनामा मंजूर केला. एवढंच नाही तर त्याचं नगरसेवकपद रद्द करण्यासाठी विशेष सभा घेऊन तसा ठरावही करण्यात आला. आता इथंच काही सारं राजकारण थांबणार नव्हतं. कारण रिक्‍त झालेल्या उपमहापौरपदासाठी निवडणूक लागली.

आधी म्हणे, उपमहापौरपदाची खुर्ची ‘शापित’ असल्याचे सांगत या पदासाठी कोणी इच्छुक नव्हतं म्हणे. पण, पीठासन अधिकारी असलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर करताच, मनपातलं राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघालं र्ींआणि दहाव्याच्या पिंउावर कावळ्याच्या उड्या पडाव्यात, तशा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उड्या पडल्या. आधी भाजपाच्या आगरकर गटाकडनं दत्ता कावरेंचं नाव पुढं आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बंडखोर गटानंही तेच लावून धरलं. सत्ताधारी सेनेलाही तेच नाव हवं होतं. पण कावरेंनी ते इच्छुक नसल्याचं सांगितल्यानं दुसर्‍या नावांची चर्चा सुरू झाली.

मात्र, छिंदमच्या वक्‍तव्याचं प्रायश्‍चित्त म्हणून उपमहापौर निवडणूक भाजपा लढविणार नाही, असा निर्णय खा. गांधींनी प्रदेशाध्यक्षांकडून करवून आणला (अस्स आगरकर गट म्हणतोय). आता हे खरंच ‘प्रायश्‍चित्त’ की आगरकर गटाबरोबरच शिवसेनेवर ‘कुरघोडी’, हे सर्वांच्याच लक्षात आलंय. भाजपनं निवडणुकीतून माघार घेतल्यानं, शिवसेनेनं आपला उमेदवार अनिल बोरूडे यांच्या रूपानं रिंगणात उतरवला खरा. पण, मतदान करायचं की तटस्थ रहायचं, ही भूमिका भाजपनं गुलदस्त्यातच ठेवल्यानं शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. त्यातच सत्तेत असूनही दुखावल्या गेलेल्या अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकल्यानं सेनेची आणखीच पंचाईत झाली.

सत्तेत असलेल्या मनसेकडून वीणा बोज्जा, सेनेच्याच दीपाली बारस्कर यांनी सेनेचेच डॉ. सागर बोरूडे अन् महिला बालकल्याण समिती सभापती सारिका भूतकर यांच्या पाठिंब्यावर दाखल केलेला अर्ज, बंडखोर गटातील मुदस्सर शेख अन् समद खान यांचे अर्ज, सत्ताधार्‍यांच्या अंतर्गत वादाचा लाभ उठविण्यासाठी राष्ट्रवादीकडून दाखल झालेले विपूल शेटिया आणि आरिफ शेख यांचे अर्ज, यामुळे उपमहापौर निवडणुकीत नको तितकी रंगत निर्माण झाली.

मग काय बैठकांचे फड सुरू झाले. बंडखोर गटाच्या मुदस्सर शेख यांनी तर सेना आणि काँगे्रस, अशा दोन्ही बैठकांना हजेरी लावली. त्यामुळे गलितगात्र झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी भाजपाची बैठक सुरू असतानाच तेथे जाऊन खा.गांधींपुढे पाठिंब्यासाठी लोटांगण घातलं. त्यामुळं सत्तेसाठी ‘तुझं माझं जमेना, अन् तुझ्यावाचून करमेना’चा प्रत्यय पुन्हा आला. सत्तालोलुपतेसाठी सर्व काही, दुसरं काय? मात्र, छिंदम प्रकरणात सेनेकडून ‘टार्गेट’ करण्यात आल्यानं संतापलेल्या खा. गांधींनी सेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांना खडे बोल सुनावत बैठकीतून निघून जाणं पसंत केलं. त्यामुळं सेनेनं पुन्हा बैठकांवर बैठका घेत आपला मोर्चा काँगे्रस-राष्ट्रवादी बंडखोर गट, मनसे आणि सेना नगरसेविका बारस्कर याचा राग शमविण्यासाठी वळविला.

त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आल्याचं सांगितलं जातयं. त्यामुळं राष्ट्रवादीचंही अवसान गळालं असल्याचं बोललं जात असलं तरी ते निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, खरं कायं अन् खोट काय हे त्यांनाच माहित. असो, ‘दिल्ली अब दूर नही’, कारण आजच उपमहापौर निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचा  फैसला होणार आहे. मात्र, सत्तेसाठीचे रंगलेले हे सर्व खेळ पाहता आता  राजकारणातही सर्व क्षम्य असतं, असंच म्हणावं लागेल..!