Fri, Apr 26, 2019 15:32होमपेज › Ahamadnagar › जलपर्णीमुळे भीमा नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी. 

जलपर्णीमुळे भीमा नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी. 

Published On: Apr 28 2018 11:20AM | Last Updated: Apr 28 2018 11:20AMश्रीगोंदा : अमोल गव्हाणे 

भीमा नदीपात्रात पाण्यावर तरंगलेल्या जलपर्णीच्या विळख्यामुळे पात्रातील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे पात्रात असणारे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा, दौंड आणि शिरूर तालुक्याच्या सरहदीतुन भीमा नदीचे पात्र वाहते. गेल्या काही वर्षात नदीपात्रात जलपर्णीचे आक्रमण झाल्याने नदीपात्राचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले. आता नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने त्यातच जलपर्णीचे आयुर्मान संपल्याने जलपर्णी जळून जावून ती पाण्याच्या तळाला जावून बसली त्यामुळे साहजिकच पात्रात असणारे मासे दूषित पाण्यामुळे मरु लागले आहेत. पाण्यात मासे मरु लागल्याने परिसरात याची मोठी दुर्घंधी पसरली आहे.

कौठा, गार, अनगर या भागातील शेती नदीपात्राच्या पाण्यावर अवलंबून आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार पात्रातील दूषित पाण्यामुळे शेतीला पाणी देताना हात काळे पडतात, अंगाला खाज सूटत असल्याच्याही काही तक्रारी आहेत. 

जनावराना फिल्टरचे पाणी 

कौठा येथील उमेश परकाळे म्हणाले, जलपर्णीच्या संकटामुळे हजारो मासे मेले आहेत. नदीपात्रातील पाण्याची दुर्घन्धी सुटल्याने जनावर हे पाणी पित नाहीत. परिसरात असणाऱ्या विहिरीचे पाणी क्षारयुक्त असल्याने ते पाणी पाजले की जनावर आजारी पडतात यावर उपाय म्हणून फिल्टरचे पाणी पाजावें लागत आहे. 

कायमस्वरूपी उपाययोजना हवी

गेल्या काही वर्षात नदीपात्रात असणाऱ्या जलपर्णीचे मोठे संकट ओढवले आहे. या जलपर्णीमुळे अडचणीत भर पडत असल्याने प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोड़गा काढणे आवश्यक आहे.