Tue, May 26, 2020 23:10होमपेज › Ahamadnagar › उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली

उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 1:11AM

बुकमार्क करा

भेंडा ः वार्ताहर

बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी रेल्वे मार्गास गती मिळावी व झालेले चुकीचे सर्वेक्षण रद्द व्हावे, यासाठी उपोषण सुरू करण्यात आले असून, उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे. काल (दि.5) कुकाण्यासह परिसरातील 10-12 गावांतील व्यवहार बंद ठेवून उपोषणास पाठिंबा देण्यात आला. 

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रामेश्‍वर शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची काल तपासणी करून  त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा आग्रह धरला. मात्र त्यास नकार दिल्याने रितेश भंडारी, कारभारी गरड, निसार सय्यद, प्रकाश देशमुख, महेश पुंड, सुरेश नरवणे यांना उपोषण स्थळीच सलाईन व औषधोपचार देण्यात आले. 

1 डिसेंबरपासून रेल्वेमार्गासाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे 6 जणांनी उपोषण चालू केले आहे. उपोषणात मध्यस्थी करण्यासाठी आतापर्यंत आ. बाळासाहेब मुरकुटे, खा. सदाशिव लोखंडे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे,  दौंड रेल्वेचे रमेश वैरागकर, सोलापूर रेल्वेचे एस. सुरेश, नगर रेल्वेचे आर. एस. मिना, सुधांशुकुमार, कार्यकारी अभियंता पंढरीनाथ पैठणकर, शाखा अभियंता धांडोरे या अधिकार्‍यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेऊन उपोषण स्थगित करण्याचा आग्रह धरला. वरील अधिकार्‍यांच्या भेटीने समाधान न झाल्याने व त्यांनी लेखी आश्‍वासन देण्यास असमर्थता दाखविल्याने जोपर्यंत मुंबई येथील जनरल मॅनेजर उपोषण स्थळी येऊन लेखी आश्‍वासन देत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाहीत, यावर उपोषणकर्ते ठाम आहेत. काल दुपारी आ. मुरकुटे यांनी स्वतः अधिकार्‍यांशी चर्चा करुन मध्यस्थीसाठी प्रयत्नशिल आहेत. 

शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांनी भेट देऊन तालुक्याचा पाठिंबा दिला. काल कुकाणा ग्रामपंचायत, भेंडा बुद्रुक, तरवडी, भायगाव, जेऊर हैबती, चिलेखनवाडी, गोडेगाव, म्हसले, सोनई, देवगाव, देवसडे, सुकळी, तेलकुडगाव, पाथरवाले यासह श्री संतसेना महाराज ग्रुप, नेवासा पंचायत समिती, संत नागेबाबा परिवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नगर जिल्हा, नेवासा तालुका शेतकरी संघटना, भारतीय जनसंसद , भाजप महिला आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती पक्ष, समर्पण फाऊंडेशन, पेन्शनर असोशियन, मेडिकल असोशियन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉ. सेल आदींनी या उपोषणास पाठींबा दिला आहे. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी चक्री उपोषणाचा निर्णय घेतला आहे.