Thu, Apr 25, 2019 05:51होमपेज › Ahamadnagar › भंडारदरा सुरक्षेविषयी टोचले कान

भंडारदरा सुरक्षेविषयी टोचले कान

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 30 2017 12:33AM

बुकमार्क करा
भंडारदरा : वार्ताहर

भंडारदरा धरणाला सुरक्षेच्या कारणास्तव वर्षाअखेरीस काही घातपात होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून दहशतवाद विरोधी पथकाने काल (दि.29) सुरक्षेची पाहणी केली. पथकाने कडक सूचना शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांना दिल्याचे समजते.

भंडारदरा धरण ब्रिटीशकालीन असून या धरणाला अतिरेक्यांचा धोका सांगितला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार पो.नि. पांडुरंग पवार, एस. एस. डाके, बी.डी. खुळे  या नगर येथील दहशतवादी विरोधी पथकाने  भंडारदरा धरण सुरक्षेची पाहणी केली. त्यांच्या समवेत राजूर पोलिस ठाण्याचे प्रवीण थोरात व नितीन सोनवणे होते. 

यावेळी धरणावर सुरक्षेसाठी असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांपासून ते डॅमवरील चौकीदाराची पथकाने चौकशी केली. तसेच संपूर्ण धरणाची पाहणी या पथकाकडून करण्यात आली. यावेळी चौकीदारासाठी ठराविक गणवेश असावा, धरणाच्या दोन्ही गेटवर पोलिसांनी कायमस्वरुपी हजर राहावे, पर्यटकांसाठी धरणावर बंदी असावी, अवजड वाहतूक धरणावरुन करु नये. सीसीटीव्ही कॅमेरे कायम सुस्थितीत चालू असावे, अशा अनेक सूचना या पथकाने केल्या. सुरक्षाव्यवस्थेवर कडक ताशेरे ओढले आहेत. गेल्या दोन महिन्यात या पथकाने या धरणाची दुसर्‍यांदा पाहणी केली आहे. भंडारदरा धरणावरून रतनवाडी, भंडारदरा गाव, गुहिरे, मुतखेल, कोलटेंभे या गावांना जाण्यासाठी कमी वेळ लागतो. परंतु धरणावरून सुरक्षेच्या कारणास्तव रहदारी बंद केल्याने तीन ते चार किलोमीटर दुरच्या अंतरावरून या खेड्यातील लोकांना प्रवास करावा लागत आहे. तसेच ज्युनिअर व सिनिअर कॉलेज भंडारदरा वसाहतीत असल्याने विद्यार्थ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.