Tue, Jul 23, 2019 02:06होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये ‘आयपीएल’वर सट्टा!

नगरमध्ये ‘आयपीएल’वर सट्टा!

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 16 2018 11:57PMनगर : प्रतिनिधी

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणार्‍या दोघांना अटक करून, त्यांच्याकडून सव्वालाख रुपयांची रोख रक्कम, लॅपटॉप, 9 मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. 15) रात्री माणिकनगर परिसरातील बुकीच्या राहत्या घरी प्लॅटवर छापा टाकून ही कारवाई केली आहे. अटक केलेल्यांमध्ये महेश जगन्नाथ बल (20, रा. शास्त्रीनगर, केडगाव), परमेश्‍वर रामदास पवार (29, रा. नालेगाव) यांचा समावेश आहे. लक्ष्मण खासेराव रणसिंग (रा. माणिकनगर, नगर) हा बुकी फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडून 1 लाख 24 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, एक डेल कंपनीचा लॅपटॉप, 9 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट, एक पोर्टेबल 14 इंची टी.व्ही., आकडेमोड केलेली पाने असा एकूण 1 लाख 64 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

रविवारी रात्री किंग्ज इलेव्हन पंजाब व चेन्नई सुपर किंग्ज यांच्या आयपीएलचा क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यावर नगर-पुणे रस्त्यावरील माणिकनगर परिसरातील रणसिंग याच्या प्लॅटमध्ये राहत्या घरी बेटिंग लावले जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक सुधीर पाटील, कर्मचारी मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, रवींद्र कर्डिले आदींच्या पथकाने प्लॅटवर रात्री 11 वाजता छापा टाकला. तेथे दोन जण खेळाडूंचे रन व विकेटवर बेटिंग लावत असल्याचे दिसले. पोलिसांनी तेथून दोघांना ताब्यात घेऊन रोख रक्कम व मुद्देमाल जप्त केला. त्यांनी लक्ष्मण रणसिंग याच्यासाठी सट्टा बुकींग करीत असल्याचे सांगितले.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सचिन अडबल यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी आरोपींना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 

Tags :  Ahmadnagar, betting,  IPL