Tue, Jun 25, 2019 13:08होमपेज › Ahamadnagar › शेतकरी आंदोलनात फूट पाडणार्‍यांना चोख उत्तर देणार : अ‍ॅड. कमल सावंत

शेतकरी आंदोलनात फूट पाडणार्‍यांना चोख उत्तर देणार : अ‍ॅड. कमल सावंत

Published On: Jun 04 2018 1:02AM | Last Updated: Jun 03 2018 11:22PMनगर : प्रतिनिधी

शेतकरी आंदोलनामध्ये काही संघटना फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोअर कमिटीपेक्षा वेगळी भूमिका घेऊन आंदोलनात दुफळी निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर देण्याचा इशारा अ‍ॅड. कमल सावंत यांनी दिला आहे. 

शेतकरी आंदोलनाबाबत अ‍ॅड. कमल सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थिती स्पष्ट केली. या प्रसंगी अ‍ॅड. विजय काकडे, मनोज दरांगे, दत्ता शेडगे, बापू लष्करे आदी उपस्थित होते. 
अ‍ॅड. सावंत म्हणाल्या, केंद्र व राज्य सरकारचे धोरण हे उद्योजकधर्जिणे आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे या सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. शेतीमाला हमी भाव नसल्याने उत्पादन खर्चही शेतकर्‍यांच्या पदरात पडत नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यातील शेतकर्‍यांमध्ये या सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. शेतकर्‍यांनी मागील वर्षी 1 जूनला राज्यव्यापी ऐतिहासिक आंदोलन केले. या आंदोलनानंतर सरकारला जाग आली. त्यांनी कोअर कमिटीला शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनांची पूर्तता अद्यापपर्यंत केलेली नाही. 

दुधाला जाहीर केलेला भावही मिळत नाही. शेतकर्‍यांच्या दुधाला 20 ते 22 रुपये लिटर भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. कोअर कमिटीने ठरविल्याप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आंदोलनास सुरूवात झाली आहे. 

कोअर कमिटीने ठरविल्याप्रमाणे आंदोलन योग्य दिशेने सुरू आहे. या आंदोलनात काही संघटनेचे पदाधिकारी घुसून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. कमिटीने ठरविल्यापेक्षा वेगळा अजेंडा ते राबवित आहेत. मागील वर्षीही मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला निमंत्रित नसताना, या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपला वेगळा अजेंडा राबविणे बंद करावे. अन्यथा, त्यांना प्रतिउत्तर दिले जाईल. या आंदोलनात राज्यातील 120 पेक्षा अधिक शेतकर्‍यांशी संबंधीत संघटना सहभागी झाल्या आहेत.  दि.5 जूननंतर आंदोलन तीव्र होणार आहे. दि.7 व 8 जून रोजी बाजार समित्या बंद पाडल्या जाणार आहेत. दि.10 जूनला देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर ही सरकारने मागण्या मान्य न केल्यास कोअर कमिटीतील निर्णयाप्रमाणे पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. 

दुधाचे भाव वाढवावेत, उत्पादन खर्च अधिक हमी भाव प्रत्येक शेतीमाला जाहीर केला पाहिजे. शेतकर्‍यांना वृद्धापकाळात निवृत्ती वेतन दिले पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी, बैलगाडी शर्यतींना परवानगी द्यावी, मागील वर्षी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू राहणार आहेत.