Wed, Jan 16, 2019 10:03होमपेज › Ahamadnagar › दहा हजार गर्भवतींना ‘मातृवंदन’चा लाभ

दहा हजार गर्भवतींना ‘मातृवंदन’चा लाभ

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:45PMनगर : प्रतिनिधी

1 जानेवारी 2017 पासून गरोदर असलेल्या गर्भवती मातांना केंद्र शासनामार्फत पाच हजाराचा लाभ मिळणार आहे. गर्भवती महिलांसाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदन योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नोंदणी करण्यात येत आहे.

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यात येते. त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणार्‍या नवजात बालकांचे ही आरोग्य सुधारावे आणि मातमृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदन योजना सुरु केली आहे. त्यानुसार गर्भवती मातांना हा लाभ देण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केली असल्यास देण्यात येतील. दुसर्‍या टप्प्यात 2 हजार रुपये एकदा प्रसुतपुर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पुर्ण झाल्यानंतर देण्यात येतील. तिसर्‍या टप्प्यात दोन हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास बी.सी.जी. पोलिओ, काविळ ब व पेंटावॅलंट लसीकरण पुर्ण झाल्यानंतर देण्यात येतील. योजनेचा आर्थिक लाभ हा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.