Sun, Mar 24, 2019 22:54
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › लाळ्याखुरकतने पशुधन धोक्यात

लाळ्याखुरकतने पशुधन धोक्यात

Published On: Dec 08 2017 1:35AM | Last Updated: Dec 07 2017 11:13PM

बुकमार्क करा

बेलपिंपळगाव : वार्ताहर

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव भागात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. गेल्या महिन्याभरात गावात अनेक जनावरांचा लाळ्या खुरकतामुळे मृत्यू झाला आहे. तरी देखील पशुवैद्यकीय केंद्रात लाळ्या खुरकताची लस उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात आले आहे.

गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात  सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात येणारी लस उपलब्ध झाली नाही. जर ही लस उपलब्ध करून दिली असती, तर गावातील ही मुकी जनावरे दगावली नसती. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा या मुक्या जनावरांना भोवला याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात असून, याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे. बेलपिंपळगाव येथे पशु वैद्यकीय श्रेणी 2 चा  दवाखाना आहे. या अंतर्गत या भागातील बेलपिंपळगाव, जैनपूर, घोगरगाव, बेलपांढरी, पाचेगाव, पुनतगाव हे गाव येतात. 

बेलपिंपळगाव भागातील सर्व गावे मिळून जवळपास शेकडो  जनावरांना लाळ्या खुरकतची लागण झाली आहे. साधारणपणे लाळ्या खुरकतची लस सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होत असते. मात्र, आज डिसेंबर महिना असूनही लस जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालक खासगी लस देत असून, त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  या रोगाची लक्षणे म्हणजे जनावरे लाळ गळतात, चारा खाणे बंद होते, पायाच्या खुरा सुजतात. यामुळे अनेक पशुपालक हैराण झाले आहेत.

दरम्यान, या आजाराने गावातील अनेक शेतकर्‍यांच्या गायी दगावल्या आहेत. शेतकर्‍यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. मात्र, या संकटामुळे शेतकर्‍यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून शेतकरी आपली जनावरे कवडीमोल भावात विकत आहेत. पशुवैद्यकीय विभागाच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर लस उपलब्ध न झाल्याने परिसरात हा रोग बळावला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लाळ्या खुरकतची लस पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.