Tue, Apr 23, 2019 09:52होमपेज › Ahamadnagar › तेलकुडगाव रस्त्याची साडेसाती कधी हटणार ?  

तेलकुडगाव रस्त्याची साडेसाती कधी हटणार ?  

Published On: Jul 23 2018 1:06AM | Last Updated: Jul 22 2018 10:27PMनेवासा : कैलास शिंदे

पाहुणे विचारतात मुख्य रस्ता कोणता? अनेकांना मणक्याचा त्रास तर काहीना अपंगत्व नेवासा तालुक्यातील व शिर्डी लोकसभा तर चांदा जिल्हा परिषद मतदार संघातील शेवटचे टोक असलेले तेलकूडगावच्या सर्व मुख्य रस्त्याची पूर्णपणे  दयनीय अवस्था झाली असून गावातील ग्रामास्थांकडे येणारे पाहुणेमंडळी तुमच्या गावाचा मुख्य रस्ता कोणता ? असाच प्रश्न विचारतात. तर गावाच्या नागरिकांना या खड्यामुळे मणक्याचा त्रास झाला तर अनेकांना अपंगत्व आले असून यामुळे तेलकूडगाव रस्त्याची साडेसाती कधी हटणार ? असाच प्रश्न तेलकुडगावच्या नागरिकांना पडला आहे. 

मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या गावांत दोन्ही कारखान्यांना हजारो टन ऊस पुरवणार्‍या या गावांच्या रस्त्याची दुरावस्था पाहता हा रस्ता की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या चांदा गटात या गावाचा समावेश होत असून गटाचे प्रतिनिधी एक वर्षानंतरही फिरकले नसल्याने रस्त्यासहित अन्य जिल्हा परिषदच्या योजनेपासून तेलकुडगाव वंचित राहत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.  मतासाठी झोळी घेऊन फिरणार्‍यांनी  गटातील ठराविक गावाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेत नाराजी वाढत आहे. तसेच तालुक्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्त्याची देखभाल दुरस्ती असतानाही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वेड्याबाभळी रस्ता अरुंद रस्त्यावर पाईपलाईनचे खड्डे मोठमोठाले झाल्याने या संकटाचा सामना सर्व सामन्या प्रवाशांना करावा लागत आहे. 

तेलकुडगाव प्रमाणे गटातील इतर गावांच्या रस्त्याची दुरवस्था अशीच आहे. सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक प्रतीक्षा करत आहे. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून या रस्त्याचे कामे होत नसल्याने जनतेत उलटसुलट चर्चा झडत आहे. तेलकुडगाव हे सधन गाव असून, मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याला हजारो टन ऊस पुरविणारे गाव म्हणून परिचित असून या गावातून दररोज हजारो लिटर दूध बाहेर जात आहे. या गावाची लोकसंख्या 5500 ते 6000 पर्यंत असल्याने बारावी नंतरच्या शिक्षणासाठी मुले-मुली बाहेरच्या गावासाठी याच रस्त्याने ये-जा करतात. या रस्त्यावर रोज एकतरी लहान मोठा अपघात होत असतो. तेलकुडगाव हे नेवासा शिर्डी व चांदा जिल्हा परिषद मतदार संघातील शेवटचे व अडगळीतील गाव असल्याने याकडे अधिकारी व  लोकप्रतिनिधी येण्यास अनेक दिवसांचा विलंब लागतो. पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्याने दिवसा ये-जा करणे देखील अवघड झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये चीड व्यक्त होत आहे. 

आमच्या गावाला ये-जा करण्यासाठी असलेले मुख्य रस्ते हे पूर्णपणे उखडले असून एकाही रस्त्याला डांबरीकरण असल्याचा अंश राहिला नाही. सर्व रस्त्यावर खड्डेच खड्डे. रस्ता अरुंद, काट्या वेड्याबाभळी वाढल्या असून यामुळे मवाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढत आहे. हा रस्ता त्वरित डांबरीकरण करावा, अन्यथा आम्ही रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे  मच्छिंद्र म्हस्के यांनी दिला आहे.