Thu, Apr 18, 2019 16:02होमपेज › Ahamadnagar › अंधश्रद्धेतून अल्पवयीन मुलीचा बळी?

अंधश्रद्धेतून अल्पवयीन मुलीचा बळी?

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 06 2018 1:10AMराहुरी : प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळीमिया शिवारात मुंडके, हात व पाय नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवडाभरापासून गायब झालेल्या या मुलीचा मृतदेह चंद्रग्रहणानंतर सापडल्याने तिचा  अंधश्रद्धेतून बळी दिल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. 

मनीषा रोहिदास वाघ (13, रा. मुसळवाडी तलावाजवळ, टाकळीमिया, ता. राहुरी) असे या मृत मुलीचे नाव आहे. ही मुलगी आपल्या राहत्या घरातून आठवडाभरापूर्वी गायब झालेली होती. आई -वडिलांनी शोध घेऊनही तिचा तपास लागला नव्हता. सोमवारी सकाळी एक महिला मुसळवाडी तलावालगतच्या सतीश शंकर सोनवणे यांच्या ऊस क्षेत्रात गवत आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला मुंडके, डावा हात  व डावा पाय नसलेला मृतदेह दिसला. महिलेने आरडाओरडा करताच ग्रामस्थांची 

गर्दी जमा झाली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण भोसले, सविता सदावर्ते, हवालदार बंडू बहिर, सतीश त्रिभुवन आदींचा ताफा दाखल झाला.
पोलिस पथकाने तातडीने श्‍वान पथक व वन विभागास घटनास्थळी बोलावून घेतले. 

दुपारी उशिरापर्यंत पोलिस मुलीच्या मृत्यूबाबत ग्रामस्थांशी चौकशी करून घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत होते. सायंकाळी मनिषा वाघ हिचे टाकळीमियामध्ये घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर घटनेचा उलगडा होणार आहे. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. 

मनिषा वाघ हिचे वडिल रोहिदास वाघ हे गेल्या अनेक वर्षांपासून पैठण (जि. औरंगाबाद) हे मूळ गाव सोडून सासुरवाडी असलेल्या टाकळीमिया येथे मजुरीसाठी आलेले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी मनिषासह दोघे पतीपत्नी 27 जानेवारी रोजी टाकळीमियाच्या आठवडे बाजारात गेलेे होतेे. मुलगी मनिषा बाजार खरेदी करण्यासाठी गेली असता परत आलीच नाही. तिचा सर्व बाजारात शोध घेऊनही ती सापडली नव्हती. सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला. अखेरीस मनिषा गावी पैठण (जि. औरंगाबाद) येथे गेली असावी, असा समज झाल्याने पोलिसांना कळविले नव्हते, असे त्यांनी सांगितलेे. 
दरम्यान, टाकळीमिया गावात मनिषा हिचा हात, पाय व मुंडके नसलेला मृतदेह आढळल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहे. मृतदेह ऊस क्षेत्राच्या अत्यंत मध्यभागी टाकून देण्यात आलेला असून, मृतदेहालगतच मनिषा हिच्या डोक्याची कवटी  दिसून आली आहे. मुंडके, हात व पाय तोडून नरबळी देण्याचा अघोरी प्रकार अंधविश्‍वासातून केली असल्याची चर्चा परिसरात होत आहे. तर काहींनी बिबट्याचा हल्ला किंवा अत्याचार करून खून केला असावा, असे अनेक तर्क वितर्क लावले जात होते.