Wed, May 22, 2019 22:23होमपेज › Ahamadnagar › जामखेडमध्ये दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न

जामखेडमध्ये दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:36PMजामखेड : प्रतिनिधी 

मागील भांडणाच्या कारणावरून जामखेड-बीड रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ कारमधून आलेल्या पाच जणांनी लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकीस्वारांना तलवार व लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न व आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी पसार झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : दि. 9 रोजी फिर्यादी अशोक महादेव पठाडे (वय 30, रा. नाळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) हे मागील न्यायालयीन खटल्यासंदर्भात जामखेड येथील आपल्या वकीलांकडे विचारपूस करण्यासाठी आले होते. त्यानंतर सायंकाळी बीड कॉर्नरला गावी जाण्यासाठी बसची वाट पहात बसले होते. 

यावेळी त्यांचा मित्र संतोष गव्हाळे (रा. जामखेड) त्यांना भेटला. अशोक यांनी संतोष यांना साकत फाटा येथे सोडण्यास सांगितले. त्यामुळे दोघेही सायंकाळी साडेसात वाजता मोटारसायकलवर बसून चालले होते. बीड रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या अलीकडे वडाच्या झाडाजवळ हे दोघे लघुशंकेसाठी थांबले असता, फिर्यादीच्या गावातील आरोपी इकबाल जानमहम्मद पठाण व खान सर (पूर्ण नाव दाखल नाही, दोघेही रा. नाळवंडी. ता. पाटोदा) यांच्यासह इतर तिघे असे एकूण पाच जण हे चारचाकी गाडीने तलवार, लोखंडी रॉड व दांडके घेऊन आले. माझ्या वडिलांना का मारले, असे म्हणून तलवारीने हल्ला केला. तसेच फिर्यादी अशोकचा मित्र संतोष गव्हाळे हा सोडविण्यासाठी मध्ये आला असता त्याला देखील इतर तिघांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. 

या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी जखमींना पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. यातील पाचही आरोपी सध्या पसार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न व आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करीत आहेत. 

दरम्यान, जामखेड येथे 1 फेब्रु 2018 रोजी जामखेड पंचायत समिती कार्यालयसमोर भरदिवसा डॉ. सादिक पठाण व कय्यूम शेख यांच्यावर चारचाकी गाडीतून जात असतांना गोळीबार झाला होता. त्याबाबत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. 

हा खटला कमकूवत व्हावा, याकरिता आपले बंधू इकबाल व नातेवाईक खान यांच्यासह तिघांविरुध्द खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदन डॉ.सादिक पठाण व नातेवाईकांनी पोलिस व तहसीलदारांना दिले आहे.