Tue, Apr 23, 2019 19:54होमपेज › Ahamadnagar › सहाजणांना कोठडी, आणखी सहा अटकेत

सहाजणांना कोठडी, आणखी सहा अटकेत

Published On: Apr 12 2018 1:22AM | Last Updated: Apr 11 2018 11:29PMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात मंगळवारी रात्री अटक केलेल्या सात जणांना काल (दि. 11) दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यातील सहाजणांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली, तर महिलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 

दरम्यान, बुधवारी सागर सुभाष ठोंबरे, किशोर माणिक रोहकले, वैभव मच्छिंद्र म्हस्के, विकास पोपट झरेकर, गहिनीनाथ किसन दरेकर, सागर मुधकर डांगरे या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडी सुनाविलेल्यांमध्ये नगरसेवक फैय्याज शेख (रा. मुकुंदनगर), माजी नगरसेवक संजय गाडे (रा. फकीरवाडा), अवधूत जाधव (रा. सावेडी), धनंजय गाडे (रा. फकीरवाडा), अंकुश मोहिते (रा. सिद्धार्थनगर), एजाज ख्वाजा सय्यद ऊर्फ एजाज चिची (रा. झेंडीगेट) यांचा समावेश आहे. अलका मुंदडा (रा. सारसनगर) हिला न्यायालयीन कोठडी सुनाविल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागितलेले आहे.

बुधवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती लक्का म्हणाले की, आरोपींकडून फरार आरोपींबाबत चौकशी करायची आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात येण्यासाठी वापरलेली वाहने हस्तगत करणे आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी.

आरोपीच्या वकिलांनी पोलिस कोठडी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सहा आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली, तर महिला आरोपी मुंदडा हिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 40 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील 23 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह 11 आरोपी पोलिस कोठडीत, तर 6 जणांना बुधवारी अटक केली आहे. गुरुवारी (दि. 12) दुपारी 17 आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Tags : Superintendent of Police,   office attack Case, Six persons custody, six arrested